आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उस्मानाबाद:प्रेमवीर झिशान गुजरातेत क्वॉरंटाइन, कोरोना अहवाल आल्यानंतर पोलिस करणार चौकशी

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उस्मानाबादचे पथक तब्बल 2500 किलोमीटरचा प्रवास करून रिकामेच परतले

फेसबुकवरील मैत्रीतून थेट पाकिस्तानातील अनोळखी प्रेयसीला भेटण्यास निघालेल्या उस्मानाबादच्या प्रेमवीरास कच्छमध्ये क्वॉरंटाइन करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेले उस्मानाबादचे पथक तब्बल 2500 किलोमीटरचा प्रवास करून रिकामेच परतले आहे.

सोशल मीडियावरील मैत्रीतून निर्माण झालेल्या प्रेमसंबधातून उस्मानाबाद शहरातील झिशान सलीम सिद्दिकी हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी थेट मोटारसायकलवरून गुजरातच्या कच्छ परिसरातून पाकिस्तान सीमा ओलांडण्यासाठी निघाला होता. परंतु, त्याला कच्छजवळील खदीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाकिस्तान सीमेजवळून प्रतिबंधित क्षेत्रात ताब्यात घेण्यात आले.

उस्मानाबादचे शहर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शेख यांच्यासह एक पथक त्याला उस्मानाबादेत आणण्यासाठी १७ जुलै रोजी कच्छला दाखलही झाले. परंतु, हे पथक तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर सदरील तरुणाला सोबत न घेता अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून रिकाम्या हातीच परतले आहे.

तरुणाला कच्छमधील खदीर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक परमार यांच्या फिर्यादीवरून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी क्रिमिनल लॉ अॅमिडमेंट च्या कलम ३ (१)(६) नुसार तसेच आयपीसी १८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच झिशान सिद्दिकी हा कोविडच्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरीत्या गुजरातेत दाखल झाल्याने त्याला ताब्यात घेतल्यानंतर सध्या रुग्णालयात क्वाॅरंटाइन करण्यात आले असून त्याचा काेविड-१९ अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला खदीर पोलिस अटक करून न्यायालयासमोर हजर करणार आहेत. त्यानंतरच्या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाऊनच झिशानचा ताबा उस्मानाबाद पोलिसांना मिळणार असल्याचे कळते. त्यामुळे सध्यातरी त्याला आणण्यासाठी गेलेले पथक रविवारी (दि.१९) मध्यरात्री परत आले आहे.