आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:एसटी कर्मचाऱ्यांना न्यायाअभावी वाहकाची आत्महत्या; मृतदेह आगारात, दीड तास तणाव

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आश्वासनानंतर हलवला मृतदेह, वेतनाअभावी संपकरी उचलताहेत टोकाचे पाऊल
  • आमदारांनी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर १२ तासाने त्यांचा मृतदेह येथील बस आगारात शनिवारी उपोषणस्थळी आणला होता. त्यामुळे जवळपास दीड तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एक तास कोणीच दाखल झाले नव्हते. त्यानंतर विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी येत संपकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना लेखी अश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह हलवण्यात आला होता. दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बसस्थानकात जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच तत्काळ अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाला नियमानुसार कारवाई करण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार सुरू असताना प्रवाशांना रस्त्यावर लांब सोडल्याने त्यांना पायपीट करावी लागली.

उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी येथील वाहक हनुमंत चंद्रकांत अकोसकर हे तुळजापूर आगारात वाहक म्हणून नियुक्त आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून सुरू असलेल्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी दुखवट्यात व आंदोलनात सहभागी होते. त्यांना वेतन नसल्याने तसेच न्यायालयाकडून सुनावणीसाठी वारंवार मिळत असलेल्या ‘तारीख पे तारीख’मुळे त्यांनी शुक्रवारी (दि.२५) उस्मानाबाद शहरातील गणेश नगर भागातील राहत्या घरी टाेकाचे पाऊल उचलून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिस पंचनामे करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला होता.

त्यानंतर अंत्यविधीसाठी गावाकडे मृतदेह नेण्याऐवजी थेट आगारात आंदोलनस्थळी आणण्यात आला होता. सकाळी साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह बसस्थानकांतील उपोषणस्थळी मृतदेह आणला होता. यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासन विरोधात रोष व्यक्त करण्यात येत होता. या सर्व प्रकारामुळे तिथले वातावरण संताप रहित तणावाचे झाले होते. अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. १० वाजेच्या दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मृतदेह अंत्यविधीस घेवून जाण्यासाठी विनंती केली. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.

कर्मचारी-अधिकाऱ्यांची श्रद्धांजली
सरकार अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार, सरकारला जाग कधी येणार, हा संतप्त प्रश्न आता कर्मचारी विचारत आहेत. ११६ दिवसांपासून अधिक काळ संप सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे. आत्महत्याग्रस्त हनुमंत अकोसकर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई वडील असा परिवार आहे. त्यांच्या या निर्णयाने घरावर व एसटी कर्मचाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान उस्मानाबाद बस स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनातील कमचारी, अधिकाऱ्यांनी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

एका संपकऱ्यावर गुन्हा दाखल
प्रशासनाने संपकऱ्यावर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केली आहे. त्यानंतरही कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. प्रशासनाच्या धमक्यांना भीक न घालता आंदोलन सुरु ठेवल्याने अधिकाऱ्यांकडून कोणत्याही कारणावरून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु केले आहे. शुक्रवारी यु. डी. पवार चहा घेत असताना तेथे एसटी महामंडळ अधिकारी आले असता, पवार यांनी चहा घ्या, असे म्हटल्यावर तुझी चहा नको, असे म्हणून जाती-वाचक शिवीगाळ केली. त्यावर पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यावर प्रशासनाने थेट ३५३ गुन्हा दाखल केला. हा प्रकार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कानावर घातला. त्यानंतर आमदारांनी पोलिसांना संपर्क साधून याबाबत अधिक माहिती घेतली असल्याचे संपकरी महेश पडवळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांकडून महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. मात्र, या दरम्यानच्या कालावधीत २७०० पैकी ८७७ कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात बससेवा देण्याचे काम करण्यात येत आहेत. त्यानुसार शनिवारी दिवसभरात ९२ बसेस ४२ मार्गावर धावल्या.

दोन तास प्रवाशांची झाली गैरसोय
आत्महत्या केलेल्या वाहकाचा मृतदेह बसस्थानकात आणला होता. यामुळे बसस्थानकांतील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणस्थळी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे दीड तासापेक्षा अधिक वेळ प्रवाशी बस पोलिस मुख्यालय व देशपांडे स्टँड येथे थांबवून प्रवाशी उतरवले जात होते. यामुळे प्रवाशांना पायपीट करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावे लागले. काही वयोवृद्ध प्रवाशांना चालता येत नसल्यामुळे रिक्षाने बसस्थानकांपर्यंत यावे लागल्याने पायपीट सहन करावा लागला. काही वयोवृद्ध प्रवाशांनी बसस्थानकात सोडण्यासाठी चालक व वाचकांशी हुज्जत घातली. मात्र, दोन तासानंतर पुन्हा बसस्थानकात बस येण्यास सुरू झाल्या. तसेच स्थानकातून एक तास बस बाहेर सोडण्यात आल्या नाही. यामुळे बसस्थानकात गर्दी झाली होती.

अनुकंपाचा लाभ देण्याचे लेखी दिले

सकाळी संपकऱ्यांकडून मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना पीएफ, जीपीएफ अनुंकपावर नोकरी देण्याची मागणी झाली होती. मागणी मान्य करून त्यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर मृत कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नव्हती. तसेच ही व्यक्ती संपात सहभागी असल्याने कामावर उपस्थित नव्हती. त्यामुळे त्यांना वेतन देण्यात आले नव्हते.'' अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक.

मागण्या पूर्ण होत नसल्याने यापूर्वीही इतर कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
मागण्या पूर्ण होत नसल्याने यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये प्रामुख्याने कळंब आगारातील एका कर्मचाऱ्याने झाडावर चढून गळफास लावत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अन्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याची समजूत काढून खाली उतरवले होते. यानंतर उस्मानाबाद आगारात एका कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आग लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच याच आगारातील अन्य एका कर्मचाऱ्याने घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. शासनाकडून यावर तोडगा काढण्यात येत असल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचे समोर आले आहेत.

कुटुंबीयास ५० लाख रुपये द्यावे
आम्ही सकाळी शासन, प्रशासनावर रोष व्यक्त करून प्रशासनाकडे अकोसकर यांच्या कुटुंबीयास किमान ५० लाख रुपये देण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तत्काळ अनुकंपा धर्तीवर नोकरी देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाने अनुंकपावर नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. ” महेश पडवळ, संपकरी कर्मचारी, उस्मानाबाद.

तणावामुळे रस्त्यावरच सोडावे लागले प्रवासी, प्रवाशांना करावी लागली पायपीट

१. साडेतीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वीही अनेकांनी टाेकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. २. आतापर्यंत राज्यात ९५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. दुसरीकडे प्रशासनाकडून वांरवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर येत नाहीत. जे कामावर आहेत, त्यांना नियमित वेतन मिळत आहे. ३. कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागणार, असे समजून संपकरी आंदोलनावर ठाम आहेत. प्रशासनाकडून अनेकदा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत सूचना करूनही फायदा झाला नाही.

कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी गठीत समितीच्या अहवालावर २५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, दोन आठवड्यांची वेळ दिली. प्रत्येक तारखेला निकाल लागेल, अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे. शासन, प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना थेट न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा लागून राहिली आहे. मात्र, येथे तत्काळ सुनावणी झाल्यास कर्मचारी तसेच शासनालाही यावर तत्काळ पाऊल उचलता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...