आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजाऱ्यांनाच असते प्रवेशाची मुभा:खासदारांना तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात नेणाऱ्या चौघांसह 7 पुजाऱ्यांना मंदिर प्रवेशबंदी

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेक पूजेनंतर केवळ महंत, पाळीवाल्या पुजाऱ्यांनाच गाभाऱ्यात असते प्रवेशाची मुभा

तुळजापूर येथील कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात खासदारांना घेऊन जात सुरक्षा रक्षकांना दमदाटी केल्याप्रकरणी चार पुजाऱ्यांना ६ महिन्यांसाठी मंदिर बंदी करण्यात आली. तसेच आणखी ३ पुजाऱ्यांना वेगवेगळ्या कारणांवरून ३ महिन्यांसाठी मंदिरात बंदी करण्यात आली. महिनाभरात २५ हून अधिक पुजाऱ्यांना मंदिरबंदी करण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात सकाळ-सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर केवळ महंत, पाळीकर पुजाऱ्यांनाच प्रवेश करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी १० नोव्हेंबर २०२१ रोजी काढले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याने पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख तथा पुजारी सुधीर किसनराव कदम-परमेश्वर यांच्यासह गजानन कदम-परमेश्वर व विनोद कदम-सोंजी यांनी सुरक्षा रक्षक सचिन सोनवणे यांना चोपदार दरवाजा उघडण्यासाठी दमदाटी केली तसेच सोनवणे यांनी नकार देताच “खासदार साहेबांना कुंकू लावायचे आहे, त्यामुळे चावी द्या’ म्हणत, त्यांच्याकडून चावी घेत कुलूप उघडले व खासदारांना देवीच्या चरणावरील कुंकू लावले.

या वेळी विनोद सुनील कदम-सोंजी यांनी गाभाऱ्यात प्रवेश करत चौथऱ्यावर जाऊन थांबले व त्यांच्यापाठोपाठ खासदार, पुजारी सचिन अमृतराव व इतरांनी देवीजींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. यासंदर्भात सुरक्षा रक्षक सचिन पवार यांच्याकडून प्राप्त झालेला अहवाल तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदारांनी बुधवारी चौघांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. यामध्ये पुजारी सुधीर कदम-परमेश्वर, सचिन वसंतराव अमृतराव, गजानन कदम-परमेश्वर, विनोद कदम-सोंजी यांचा समावेश आहे.

दागिने घरी नेण्याचा प्रयत्न, पुजाऱ्यावर झाली कारवाई
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील भाविक परिवार मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर सागर गणेश कदम या पुजाऱ्याने त्यांची दिशाभूल करून देवीला अर्पण करण्यासाठी आणलेली नथ व पैशांचा गल्ला चोरी करून घरी नेण्याचा प्रयत्न केला. भाविकाने मंदिरातील कंट्रोल रूममध्ये अर्पण वस्तूंबद्दल चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुसऱ्या पुजाऱ्याने व भाविकाने कदम यांना मंदिरात आणून या वस्तू मंदिराकडे सुपूर्द केल्या व त्याची भाविकाच्या नावाने रीतसर पावती करण्यात आली. त्यामुळे मंदिर प्रशासनाने सागर कदम यांना देऊळ कवायत कलम २४ व २५ नुसार पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर बंदी घातली.

सुरक्षा रक्षक तसेच धार्मिक व्यवस्थापकांशी हुज्जत घालून सुरक्षा रक्षकांशी अरेरावी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी पुजारी अरविंद भोसले यांच्यावर तीन महिने मंदिरबंदीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच ओंकार हेमंत इंगळे यांनीही सुरक्षा रक्षकांना दमदाटी करून अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली, त्यामुळे त्यांनाही ३ महिने मंदिरबंदी करण्यात आली आहे. दुसऱ्या एका प्रकरणात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याप्रकरणी सुधीर किसनराव कदम-परमेश्वर यांना ३ महिने मंदिरबंदी करण्यात आली आहे. कदम यांना सोमवारी ३ महिन्यांची मंदिरबंदी केलेली असताना बुधवारी खासदारांना गाभाऱ्यात नेल्याप्रकरणी आणखी ६ महिन्यांची मंदिरबंदी घालण्यात आली आहे.

महिन्यात २५ वर पुजाऱ्यांवर कारवाया
तुळजाभवानी मंदिरात निजामकालीन देऊळ कवायत कायद्यानुसार कारभार चालतो. गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांना या कायद्यातील कलम २४ व २५ नुसार मंदिरात प्रवेशबंदी केली जाते. ही शिक्षा पुजाऱ्यांसाठी कठोर असते. गेल्या महिनाभरात मंदिर प्रशासनाने २५ हून अधिक पुजाऱ्यांवर या कलमानुसार कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...