आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेराफेरी:नारळ वाहतूक करणाऱ्या वाहनात निघाला गांजा; 6 क्विंटलवर मुद्देमाल अखेर जप्त

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सतर्क नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर केली कारवाई

तालुक्यातील पारगाव येथे मंगळवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास वाहन बंद पडल्याने वाहनासह ६५ लाखाचा गांजा वाशी पोलिसांच्या हाती लागला आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका ओलांडून बीडच्या दिशेने निघालेला टाटा पिकअप (एपी ३६ टीबी १६५२) पारगाव येथे रात्री १२ च्या सुमारास बंद पडला. या वेळी परिसरातील रहिवासी पासिंगवरून गाडी बाहेरच्या राज्यातील आहे, काही घोटाळा झाला आहे का म्हणून विचारपूस करण्याच्या दृष्टीने गाडीच्या दिशेने गेले. त्या वेळी गाडीजवळ उभ्या असलेल्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. नागरिकांनी गाडीजवळ जाऊन भरलेल्या मालाची पाहणी केली असता संपूर्ण गाडीमध्ये ओले नारळ दिसून आले. काही नागरिकांनी नारळ लंपास करण्यास सुरुवात केली. मात्र, नारळाच्या खाली वेगळ्याच मालाची पोती भरून ठेवल्याचे निदर्शनास आले. यामुळे काही नागरिकांनी गस्तीवर असलेल्या वाशी पोलिसांच्या पथकाला याची माहिती दिली. पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अशोक चौरे, कॉन्स्टेबल राजू लाटे, बळीराम यादव, जगताप यांनी या ठिकाणी जाऊन वाहन ताब्यात घेतले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये रोडवर सदरील पोत्यामध्ये काय आहे हे पहिले असता भरलेली पोती ही गांजाची असल्याचे लक्षात आले. त्यांनी सदरील पिकअप रात्री चावी नसल्याने डायरेक्ट सुरू करून वाशी ठाण्यात घेऊन आले. बुधवारी दुपारी नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांच्या उपस्थितीत या गाडीतील मालाचा पंचनामा करण्यात आला. या मालाचे वजन करण्यात आले असता यामध्ये ६ क्विंटल १९ किलो गांजा व वाहन असा एकूण ६४ लाख ९७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे समोर आले. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अशोक चौरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक उस्मान शेख करत आहेत. वाहनात बनवला गुप्त हाैद, त्यात ठेवला होता सर्व गांजा गांजा वाहतूक करणाऱ्या गाडीत ९ इंच उंचीचा गुप्त हौद बनवण्यात आला. परंतु, वरच्या बाजूला बसवलेल्या नटामुळे पोलिसांना शंका आली. नट काढले असता वाहनाच्या हाैदातील कप्पा व त्यामध्ये खाकी टिस्को टेपने दोन किलोच्या बॉक्समध्ये गांजा लपवण्यात आल्याचे दिसून अाले. नारळाच्या खाली गांजाची पोती आढळून आली नसती तर हा कप्पा व त्यातील गांजाची पाकिटेदेखील हाती लागली नसती. वाहनातून नेला जाणारा गांजा जप्त केला गेला. इन्सेट : नारळाच्या खाली लपवून गांजाची वाहतूक केली जात होती.

बातम्या आणखी आहेत...