आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:उस्मानाबादचा भूतकाळ डिजिटल रूपात, गॅझेटियर ऑनलाइन आणि मराठीतून..!

उस्मानाबाद | चंद्रसेन देशमुख18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्ह्याचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक असा शेकडो वर्षांचा भूतकाळ डिजिटल स्वरूपात येत आहे. जिल्ह्याचे गॅझेट (राजपत्र) आता ऑनलाइन स्वरूपात येणार असून त्यासाठी पुण्यातील फ्लेम युनिव्हर्सिटीतील ३ प्राध्यापकांसह १० विद्यार्थ्यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे. १५ ऑगस्टला हे गॅझेट प्रसिद्ध होईल. विशेष म्हणजे इंग्रजीसह मराठीतूनही हे गॅझेट असेल.

प्रत्येक जिल्ह्याच्या उभारणीदरम्यान सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आदी विविध पातळ्यांवर स्थित्यंतरे येत असतात. या बदलांची नोंद केवळ दस्तऐवजांच्या माध्यमातून घेतली जाते. जिल्हा प्रशासनाकडे गॅझेटच्या स्वरूपात हा मोलाचा दस्त असतो. मात्र या गॅझेटचेही अद्ययावतीकरण आवश्यक असते. त्यामुळे मूळ गॅझेटमधील माहिती, आशय कायम ठेवत पुढच्या काळातल्या नोंदी व जुन्या संदर्भांवर आधारित गॅझेट अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यामातून सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून जिल्ह्याचे गॅझेट अद्ययावत केले जात आहे.

पुण्यातील फ्लेम युनिव्हर्सिटीसोबत यासाठी जिल्हा प्रशासनाने करार केला आहे. या युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक युगांक गोयल यांच्या नेतृत्वाखाली ३ प्राध्यापकांसह १० विद्यार्थ्यांची टीम गॅझेटचे पुनर्लेखन करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू असून १५ ऑगस्टला हे गॅझेट अद्ययावत माहितीसह ऑनलाइन आणि इंग्रजीसोबत मराठीतून समोर येईल. तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्याचा शेकडो वर्षांचा भूतकाळ जगातून कोठूनही न्याहाळता येईल.

नव्या पिढीला शोधता येतील राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहासाच्या पाऊलखुणा गॅझेटमधील भाग प्रसिद्ध करणे सुरू उस्मानाबाद जिल्ह्याचे ऑनलाइन गॅझेट येत्या १५ ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे गॅझेट उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवरच (osmanabad.nic.in) जोडलेले असेल. काही महिन्यांपासून या गॅझेटमधील काही भाग प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पीकपाणी बदलाचा घेतला आढावा
जिल्ह्यातील शेकडो वर्षांपूर्वी शेती कशी होती,
पीक पद्धतीत अलीकडे कसा बदल झाला,लोककला, लोकभाषा, लोकसंस्कृती, इितहासातील लढाया आदी माहिती गॅझेटच्या माध्यमातून वाचता येणार आहे. प्रोजेक्टसाठी अॅड. राज कुलकर्णी व केतन पुरी या दोन अभ्यासकांची निवड करण्यात आली आहे.

प्रशासकीय स्तरावरील माहिती दरवर्षी अपडेट केली जाणार
जिल्ह्याच्या संपूर्ण इतिहासाचे आकलन व्हावे यासाठी मूळ गॅझेट आणि अन्य संदर्भांवर काही लेखांचा नव्या गॅझेटमध्ये समावेश करत आहोत.त्यातून नव्या पिढीला हव्या त्या विषयांवरची माहिती सहजपणे मिळू शकेल. विशेष म्हणजे प्रशासकीय स्तरावरील माहिती आता दरवर्षी अपडेट केली जाणार आहे. उदा.कोणत्या वर्षी किती पाऊस झाला अशी वेगवेगळ्या खात्यांची माहितीही अपडेट केली जाईल.
-कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी,

बातम्या आणखी आहेत...