आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात पुणे येथील काम सुटले, झाडावर चढून आंबे काढताना पाय मोडला, पुन्हा कामासाठी परतणे शक्य झाले नाही. यामुळे उदनिर्वाहासाठी शेतात वास्तव्य करत कडक भाकरी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. परिसरात भाकरी विकून उदरनिर्वाह सुरू आहे. नातेवाईकांची साथ नसताना स्वत:च्या जिद्दीच्या बळावर उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील युवकाने संकटांवर मात केली आहे. कलदेव निंबाळा येथील कल्याणी शरणाप्पा घोटमाळे (४०) पुणे येथे स्कूलबस चालक म्हणून काम करत होते. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. त्यांच्या पत्नीलाही कामावरून कमी करण्यात आले. दोघांचाही रोजगार गेल्यामुळे उदरनिर्वाहाची भ्रांत होऊ लागली.
यामुळे आपला एक मुलगा व २ मुलींसह ते गावात येऊन शेतात वास्तव्य करू लागले. गतवर्षी झाडावर आंबे काढण्यासाठी चढताना खाली पडून पाय मोडला. यामुळे पुन्हा त्यांना पुण्याला जाता आले नाही. नंतर पायात रॉड टाकून उपचार करुनही पाय कायमचा जायबंदी झाला. त्यांना वाहन चालवणे अशक्य आहे. मात्र, गावात राहून पोट कसे भरायचे हा प्रश्न होता.
परंतु, या संकटावर मात करण्यासाठी घोटमाळे यांनी भाकरी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. कडक बाजरीच्या व ज्वारीच्या साध्या भाकरी ते तयार करत असतात. त्यांच्या पत्नी राजश्री यांनी याची जबाबदारी घेतली असून तयार झालेल्या भाकरी परिसरातील ढाबे व हॉटेलमध्ये विक्री करण्याचे काम घोटमाळे करतात. दोघांच्या परिश्रमाने फायदा होत आहे.
कोरोना व स्वत:च्या अपंगत्वावर मात करत घोटमाळे दांपत्य पुन्हा पुनश: हरि ओम म्हणत संसाराला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला कमी फायदा : कोरोनाच्या काळात सुरुवातीला यास फार प्रतिसाद मिळाला नाही. अशावेळी तत्कालीन सरपंच सुनिता पावशेरे व देविदास पावशेरे या दांपत्यानी शेतात जावून या घोटमाळे कुटुंबाला भेट देवून प्रोत्साहन दिले. भाकरीच्या व्यवसायाची सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करून ग्राहक उपलब्ध करून दिल्याने मागणी वाढण्यासाठी मोठी मदत झाली. अनेक व्यापारी घरापर्यंत येवून बाजरी, ज्वारीच्या भाकरी घेवून जावू लागल्याने आर्थिक फायदा होवू लागला.
सायकलवरुन व्यवसाय सुरू, महिन्यापूर्वी घेतली दुचाकी
कल्याणी यांच्या पायाची जखम कालांतराने बरी झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी सायकलवरून भाकरीचा व्यवसाय सुरू केला. महिन्यापूर्वी दुचाकी घेऊन त्यावर भाकरी विक्री सुरू केली. फोन, सोशल मिडीयावर आलेल्या मागणीनंतर चांगल्या प्रतिच्या बाजरी, ज्वारीच्या भाकरी घरपोच करत आहेत. दररोज १५० ते २०० ताज्या तसेच कडक चुलीच्या आरावर भाजलेल्या भाकरीची विक्री व्यवसायातून आर्थिक सुबकता साधली आहे.
महिन्याला १० हजार
ज्वारी व बाजरीच्या भाकरी विक्रीतून महिन्याला आम्ही किमान १० हजार कमावतो. त्यातून घरखर्च आणि तीन मुलांचे शिक्षण होते. अडचणीच्या काळात सरपंच सुनीता पावशेरे यांनी सहाय्य केले. - राजश्री घोटमाळे.
शेतामध्ये राहूनच काम
सध्या घरगुती वादामुळे घाेटमाळे आपल्या शेतात वास्तव्यास हआहे. शेतातच लहानशे पत्रा शेडचे घर करुन दोघांनी चुलीवरील कडक भाकरीचा हा व्यवसाय सुरू केला. पायामुळे फिरणे फारच अशक्य व त्रासाचे आहे. तरीही जिद्दीने संकटावर मात करत घोटमाळे कुटुंबीय नेटाने व्यवसाय करत आहेत. रात्री शेतात किर्र अंधार असतो. केवळ दोन चार्जिंगच्या बल्बवर त्यांना रहावे लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.