आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांडूरंग पावला:पंढरपूरच्या उद्योग समुहाने उस्मानाबादेत उभारला देशातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प, गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिस्टलरी प्रकल्प बंद ठेवून दररोज 35 लाखांचे नुकसान सहन करत उभारला ऑक्सिजन प्रकल्प
  • हवेच्या शुध्दतेसाठी नमुने मुंबईला, उस्मानाबाद जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागणार

प्राणवायुसाठी अनेक जीवांची घालमेल सुरू असताना पंढरपूरच्या डीव्हीपी ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी चोराखळी (ता.कळंब) धाराशिव साखर कारखान्याच्या माध्यमातून ऐन संकटात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मुबलक प्रमाणात प्रमाणात ऑक्सिजन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

कारखान्याने डिस्टलरी प्रकल्प बंद ठेवून दररोजचे सुमारे 35 लाख रूपयांचे नुकसान सहन करत अवघ्या 17 दिवसात ऑक्सिजन प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. ऑक्सिजनमधील हवेची शुध्दता तपासण्यासाठी बुधवारी दुपारी नमुणे मुंबईला पाठवण्यात आले असून, अहवाल येताच गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे र्व्हच्युल पध्दतीने उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हवेवर ऑक्सिजन निर्माण करणारा धाराशिव हा देशातला पहिला साखर कारखाना असून, केंद्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश सरकारकडून प्रकल्पाची माहिती घेतली जात आहे.

पंढरपूर येथील अभिजीत पाटील यांनी कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव हा खासगी तत्वावरील साखर कारखाना 5 वर्षापूर्वी विकत घेतला होता. कारखान्याचे उत्तम नियोजन करून त्यांनी शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न केला शिवाय उपपदार्थ निर्मितीतून कारखान्याचे उत्पन्नही वाढवले. कुशल व्यवस्थापनामुळे कारखान्याने व्यवसायात प्रगती केली असून, नांदेड, नाशिक येथेही स्वतंत्र साखर कारखाने उभारण्यात आले आहेत. व्यवसायात अत्यंत कमी वेळेत प्रगती केलेल्या कारखाना व्यवस्थापनाने सबंध महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.

माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या आवाहनानंतर राज्यातही एकाही साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचे आव्हान स्विकारले नव्हते, त्याचवेळी धाराशिव कारखान्याने मात्र हा निर्णय घेतला. वसंतदादा शुगर इन्सटिट्युट, मौज इंजिनिअरिंगच्या माध्यमातून कारखान्याने 17 दिवसांपूर्वी ऑक्सिजन निर्मितीचे काम हाती घेतले. कमी कालावधीत कारखान्याने हवेवर ऑक्सिजन निर्मिती सुरू केली असून, हवेची शुध्दता तपासण्यासाठी कारखान्याची टीम बुधवारी दुपारी हवेचे बलून घेऊन मुंबईला रवाना झाली आहे.

कारखान्यात तयार झालेली हवा गुणवत्तापूर्ण आल्यास ती सिलिंडरच्या माध्यमातून रूग्णांसाठी वापरण्यासाठी दिली जाणार आहे. त्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या प्रकल्पाचे र्व्हच्युल पध्दतीने उद्घाटन करतील, अशी शक्यता आहे. कारखान्याने डिस्टलरी प्रकल्प बंद करून त्या मशिनरीवर ऑक्सिजन प्रकल्प सुरू केला आहे. वास्तविक पाहता डिस्टलरी प्रकल्पातून कारखान्याला दररोज 35 लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय कारखान्याने अन्य मशिनसाठी 3 कोटी रूपये खर्च केले आहेत. ऑक्सिजनची समस्या ओळखून कारखान्याने घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही कारखान्याला सहकार्य करण्यात आले.

उत्तर प्रदेश, तामीळनाडूनची टीम येणार
सध्याची ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन व शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यांनी तीन कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प सुरू केला असून, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. असा प्रकल्प उभारणारा धाराशिव हा देशातील पहिला कारखाना असून, या प्रकल्पावर केंद्र सरकारचेही लक्ष आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू सरकारकडून लवकरच कारखान्यातील प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी टीम पाठविली जाणार आहे. त्यानंतर संबंधित राज्यातही अशाप्रकारचे प्रकल्प उभारले जाऊ शकतात.दरम्यान, प्रकल्पासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांनी प्रोत्साहन दिले तसेच प्रशासकीय स्तरावरील मदत केल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले.पालकमंत्री गडाख यांनी त्यांच्य स्वीय सहायकांची टीम प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्यावरच कार्यरत ठेवली होती.

60 टन ऑक्सिजनची क्षमता
धाराशिव कारखान्यात सध्याच्या उपलब्ध यंत्रसामग्रीनुसार दिवसाला 4 टन ऑक्सिजनची निर्मिती होईल. जिल्ह्याला 14 टन ऑक्सिजनची गरज आहे. कारखान्याने तैवानवरून मागवलेली मशिनरी दोन ते तीन दिवसांत येण्याची शक्यता आहे. तसेच काही पंप उपलब्ध झालेले नाहीत. यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यास दररोज 60 टन ऑक्सिजन तयार होईल, इतकी कारखान्यातील ऑक्सिजन प्रकल्पाची क्षमता आहे, असे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले. तयार केलेला ऑक्सिजन जिल्हा प्रशासनाकडून खरेदी केला जाईल, मात्र त्यासाठी दर निश्चित केलेला नाही, या काळात व्यापारापेक्षा लोकांचे जीव महत्वाचे आहेत, असे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...