आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक वनीकरण खात्याच्या गलथान व मनमानी कारभारामुळे नळदुर्ग ते खुदावाडी दरम्यान कॅनॉलच्या दोन्ही बाजूला दीड महिन्यापूर्वी वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे आज देखील वृक्षारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ कागदोपत्री वृक्षलागवड कशी दाखविली असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सामाजिक वनीकरण विभाग तुळजापूर च्या वतीने नळदुर्ग येथील बोरी धरण लगत खंडोबा मंदिर जवळ असलेल्या कॅनॉल ते खुदावाडी पर्यंत कॅनॉलच्या दोन्ही बाजूला लिंब, चिंच, आवळा व आंब्याचे ५ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याकरिता दीड महिन्यापूर्वी खड्डे खोदण्यात आले. मात्र आजच्या तारखेला देखील या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण न करता खोदण्यात आलेले खड्डे जैसे थे अवस्थेतच आहेत.
त्यामुळे खड्डे खोदण्याचे जे टार्गेट आहे ते पुर्ण करण्यासाठी केवळ थातुरमातुर व नियमबाह्य खड्डे खोदून फक्त जेसीबीवाल्याना जगविण्याचे काम याठिकाणी झाले की काय असा संशय आहे. त्याचबरोबर हे खड्डे खोदत असताना दोन खड्ड्यामधील अंतर किती असावे त्या खड्ड्याची खोली किती असावे याचेही पालन याठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आलेले नाही.
खड्डे खोदत असताना कॅनॉलची साफ-सफाई करून जे गाळ (वेस्ट मटेरियल) बाहेर काढून टाकण्यात आले आहे, त्याच्यावर देखील या ठिकाणी खड्डे मारून वृक्षरोपण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात झाडे लावा झाडे जगवा यासाठी वृक्षरोपण मोहीम हाती घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्याकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत चालढकल होत असल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण बिघडत चालले आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्यामुळे हवा अशुद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण महत्वाचे आहे. तेच काम करण्यात जर अशा प्रकारची दिरंगाई होत असेल तर ही काळजीची बाब होय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.