आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत स्थानिक जातपंचायतीची:जातपंचायतीच्या छळाच्या भीतीने दांपत्याने घेतले विष; पतीचा मृत्यू, मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद शहरालगत सांजा (ता. उस्मानाबाद) येथील पारधी पेढीवर पंचायतीकडून होणारा छळ आणि पंचांच्या दहशतीमुळे काकानगर येथील दांपत्याने विष प्राशन केले. यात पत्नी बचावली, परंतु पतीचा सोलापूर येथे उपचार घेताना मंगळवारी मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. यामुळे तब्बल दीड ते दोन तास गोंधळाची स्थिती होती.

उस्मानाबादमध्ये काकानगरमधील सोमनाथ छगन काळे (४५) व पत्नी अनिता सोमनाथ काळे (४०) यांनी एकाच दिवशी २४ सप्टेंबरला जात पंचायतीच्या दहशतीमुळे विष प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना पत्नी अनिता यांची प्रकृती सुधारली. मात्र, सोमनाथ यांची प्रकृती ढासळली. तेव्हा ३० सप्टेंबरला त्यांना सोलापूरला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.

मूळ गावातून विस्थापित
सोमनाथ काळे मूळ पळसप या गावी राहत होते. तेथे एका अपघाताच्या प्रकरणात जातपंचायतीच्या छळामुळे त्यांनी गाव सोडले होते. तेव्हापासून ते काकानगरला राहत हाेते. तेव्हाही जातपंचायतीच्या पंचांनी अनैतिक संबंधांचा आरोप लावून त्यांना दंड ठोठावला. पळसप येथे त्यांची सुमारे २० एकर शेती असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले.

कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
पारधी समाजात मृतदेहाला दफन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पळसपला मृतदेह नेण्यात आला. मूळ गावापासून तीन किलोमीटरवर पारधी पेढी आहे. याच परिसरात साेमनाथ यांची जमीन आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. दरम्यान, १०० पोलिस या वेळी तैनात होते.

कारवाई झाली पाहिजे
उस्मानाबाद जिल्ह्यात पारधी समाजाच्या जातपंचायतीचा निर्णय पूर्णपणे निषेधार्ह आहे. आधुनिक काळात अशा निर्णयामुळे एखाद्याचा जीव जात असेल किंवा जातपंचायतीच्या नावाखाली समाजातील घटकाला घृणास्पद वागणूक मिळत असेल तर अशा पंचायतीविरोधात कारवाई झाली पाहिजे.- ज्ञानेश्वर भोसले, सामाजिक कार्यकर्ते, मोहोळ

कुटुंबावर प्रचंड अन्याय
सोमनाथ व त्यांच्या कुटुंबावर मोठा अन्याय करण्यात आला. समाजात अद्यापही जातपंचायतीचेच राज्य चालते. यामुळे समाजातील काही नागरिकांना खूप अडचणी येत आहेत. या प्रकारावरूनच सोमनाथ व त्यांच्या पत्नीने विष प्राशन केले. -बालाजी काळे, नातेवाईक.

पोलिसांना नाही खबर
- सांजा हे गाव उस्मानाबादलगत असूनही तेथे जातपंचायत हाेत असल्याची खबर पोलिसंाना नाही.
- जिल्ह्यातील या समाजावर केवळ पाच पंचांचा असतो वचक. त्यांनी दिलेली शिक्षा असते अंतिम.
- पंचांनी ठोठावलेली दंडाची रक्कम द्यावीच लागते. पंच या रकमेची वाटणी करून घेतात.
- नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात पारधी समाजात सातत्याने भरवली जाते जातपंचायत.
- पाच वर्षांच्या काळात प्रमाण कमी झाला असला तरी कोरोनापासून पंचांचा जोर वाढला आहे.

कारवाईचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांसोबत याप्रकरणी नातेवाइकांशी चर्चा झाली आहे. जातपंचायतीच्या जाचावरून हा प्रकार घडला आहे. यातील आरोपी कोण आहेत याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल. पोलिसांनाही आदेश देण्यात आले आहेत. -गणेश माळी, तहसीलदार, उस्मानाबाद.

जातपंचांवर गुन्हे दाखल व्हावेत
ही घटना अत्यंत निंदनीय आणि पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी २०१७ मध्ये सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा केला आहे. त्या कायद्याअंतर्गत जातपंचांवर गुन्हे दाखल व्हावे व तत्काळ अटक व्हावी. त्यासोबत पीडित परिवाराचे पुनर्वसन होण्याची गरज आहे. जातपंचायत भटक्या समाजाला लागलेला कलंक आहे. कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच हे प्रकार बंद होतील. - कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

मृतदेहासह शववाहिनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
मृतदेह असलेली शववाहिनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. दुपारी १२च्या सुमारास येथे प्रचंड गोंधळ सुरू झाला. महिला नातेवाइकांनी तेथेच आक्रोश सुरू केला. काहींनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गेट बंद करण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अंजुम शेख, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत, दंगल नियंत्रक पथक दाखल झाले. बाराबलुतेदार संघटनेचे धनंजय शिंगाडे तेथे आले. त्यांनी व काही मोजक्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून परिस्थिती सांगितली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. तसेच मृतदेहावर मूळ पळसप (ता. उस्मानाबाद) या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी देत ढोकी पोलिस ठाण्याला यासंदर्भात संरक्षण देण्याचेही आदेश त्यांनी दिले. तहसीलदार गणेश माळी यांनी संपूर्ण प्रकरणी आश्वासन दिल्यावर नातेवाईक मृतदेह घेऊन पळसपला रवाना झाले.

दहशत एवढी की पंच येण्यापूर्वीच घेतले विष
जातपंचायतीचे पंच सोमनाथ यांना घेऊन जाण्यासाठी येणार होते. मात्र, पंचांची आणि पंचायतीची दहशत एवढी होती की शिक्षा भोगण्याऐवजी आत्महत्या बरी, असा निर्णय या दांपत्याने घेतला. यापूर्वी संबंधित पंचांच्या विरोधात तक्रारीही त्यांनी दाखल केल्या होत्या.

प्रकरण काय? : सोमनाथ यांच्यावर अनैतिक संबंधांचा आरोप ठेवण्यात आला होता. यासाठी सांजा (ता. उस्मानाबाद) पेढी येथे २२ सप्टेंबरला जातपंचायत बसवण्यात आली होती. यात त्यांच्यावर २ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. यातील २० हजार रुपये वसूल करण्यात आले हाेते. उर्वरित १ लाख ८० हजारांसाठी तगादा लावण्यात आला होता. यामुळे सोमनाथ यांनी पत्नीसह विष प्राशन केले.

अशा भयंकर शिक्षा दिल्या जातात
- पंचायतीकडून डोक्यावर ५० किलोचा दगड ठेवून मारहाण
- नग्न करून काटेरी फोकाने मारणे, उकळत्या तेलात हात घालण्यास लावणे
- गरम कुऱ्हाड ७ विड्याच्या पानांसह तळहातावर ठेवणे

बातम्या आणखी आहेत...