आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व परिसरातील खेळाडूंसाठी एकमेव आधार असलेल्या येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर आता प्रचंड गदी होत आहे. व्यायामासाठी येणारे नागरिक, पोलिस भरतीचा सराव करणारे युवक-युवती, विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडू, क्रिकेट खेळणारे युवक यामुळे गर्दीत भर पडली आहे. त्यात बॉल लागूनही जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. क्रीडा विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे येथील नियोजन कोलमडले आहे. यामुळे शहरवाशियांसाठी तातडीने आणखी एक क्रीडांगण उपलब्ध होण्याची गरज आहे.
शहर व परिसरातील विविध प्रकारातील खेळाडूंसाठी श्री तुळजाभवानी स्टेडियम एकमेव आधार आहे. तसेच व्यायामासाठी युवक व फिरण्यासाठी जेष्ठ नागरिकांसाठीही हाच एकमेव पर्याय आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपासून पोलिस भरतीचा सराव करणाऱ्यांचीही संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगोदरच येथे विविध क्रीडा संस्थांकडूनही सराव घेण्यात येत आहे. यामुळे सातत्याने येथे गर्दी होत आहे. स्टेडियमची जागा कमी वापर करणारे अधिक, अशी परिस्थिती झाली असून स्टेडियम सातत्याने ओव्हर फ्लो असते. फिरणाऱ्यांनाही आता सातत्याने अडथळे येत आहेत.अशात क्रीडा विभागाचे कोणतेही नियोजन नाही. केवळ असायलाच मोठे कार्यालय असून कोणीही येथील संयोजनाकडे लक्ष देत नाही. परिणामी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
सकाळी क्रिकेट खेळणाऱ्यांकडून बॉल लागण्याची उदाहरणे आहेत. क्रिकेट खेळाडूंनाही दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे त्यांनाही येथेच सराव करावा लागतो. परिणामी सगळाच गोंधळ उडत आहे. यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांनी सर्वांसाठी एक टाईटेबल तयार करण्याची गरज आहे. दिलेल्या वेळेतच प्रत्येक खेळाडू, नागरिकांनी खेळ खेळले, व्यायाम केला तर योग्य व्यवस्थापन सहजपणे होऊ शकते. यासाठी व्यापक बैठक घेऊन सर्वांच्या अडचणी जाणून घेण्याची गरज आहे.
अधिकाऱ्यांच्या वाहनाचे वॉशिंगरूम
नेमके क्रीडा अधिकारी कार्यालयासमोरच अधिकाऱ्यांची कार उभी केली जाते. तेथेच कार्यालयातील शिपाई कार धुण्याचेही काम करतो. येथेच कराटे खेळाडू सराव करत होते. आता कार उभी केली जात असल्यामुळे त्यांना प्रवेशद्वारासमोर सराव करावा लागतो.
क्रिकेटसाठी नेटची गरज
सध्या सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. यामुळे साहजिकच युवक याकडे आकर्षित होतात. त्यांना सध्याी येथील तुळजाभवानी स्टेडियमचाच पर्याय आहे. ते खेळत असताना बाॅल लागून इतर व्यायाम, सराव व फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे क्रीडा विभागाने त्यांच्यासाठी नेट उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
दरमहा दोन लाख खर्च
उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियमच्या देखभालीसाठी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा दोन लाख रुपये खर्च करण्यात येतो. मात्र, योग्य नियोजन नसल्यामुळे दरमहा दोन लाख रुपये पाण्यात जात आहेत. त्यामुळे जिल्हा क्रीडा समितीने स्टेडियमचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच काही प्रमाणात सुधारणा होईल.
एमआयडीसीत संकुल केव्हा होणार?
एमआयडीसी परिसरात तालुका क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र, याची प्रक्रिया होऊन चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र, केवळ क्रीडा विभागाच्या व अन्य अधिकाऱ्यांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी याला मुहूर्त लागू शकला नाही. आमदार कैलास पाटील यांनी मध्यंतरी प्रयत्न सुरू केले होते. नंतर मात्र, कोरोना काळापासून याला खो बसला.
निधीअभावी मैदानाची संधी गेली
काही वर्षांपूर्वी तत्कालिन राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय बंडगर यांच्या पुढाकारातून ५० लाख रुपये निधी क्रिकेटच्या मैदानासाठी मंजूर झाला होता. यासाठी सांजा रोड परिसरात जागा पाहिली होती. शेतकरी जागा देण्यास तयार होता. परंतु, ऐनवेळी शेतकऱ्याने जागेची किंमत दुप्पट केल्यामुळे मैदान मिळण्याची संधी गेली. बंडगर यांच्यानंतर कोणीही प्रयत्न केले नाहीत. हे मैदान तयार झाले असते तर क्रिकेट खेळाडू तेथे गेले असते.
नियोजन करुन कर्मचारी नियंत्रण ठेवणार
काही दिवसांपूर्वी येथे नियोजन करण्यात आले होते. परंतु, सहकार्य न मिळाल्याने नियोजन कोलमडले आहे. लवकरच याचे नियोजन करून देण्यात येईल. क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी यावर नियंत्रण ठेवतील.-श्रीकांत हरनाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी.
क्रिकेट खेळण्यासाठी १० नंतरची वेळ द्या
लहान मुले, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांना क्रिकेट खेळणाऱ्यांचे बॉल लागले आहेत. यामुळे स्टेडियमवर फिरण्यासाठी भीती वाटत आहे. सकाळी दहा वाजल्या नंतरच क्रिकेट खेळण्यासाठी परवागनी द्यावी.-धीरज कोचेटा, नागरिक, उस्मानाबाद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.