आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविडमुळे पूर्व प्राथमिक शिक्षण देणारी केंद्र बंद होती. यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची शारीरिक, बौद्धिक, भावनिक विकास, भाषाविकास, गणनपूर्व तयारी करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येत असून, शुक्रवारी (दि. २५) उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय प्रशिक्षण पार पडले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबादद्वारा आयोजित स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान राबवण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. २५) जिल्हा परिषद शाळा उमरगा केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले. उमरगा केंद्रप्रमुख शीलाताई मुदगडे, शिक्षण विस्ताराधिकारी बाळासाहेब महाबोले, अंगणवाडी सुपरवायझर विद्याताई कांबळे यांच्यासह उमरगा केंद्रातील पहिली ते पाचवी वर्गास अध्यापन करणारे सर्वच शिक्षक अन् अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.
प्रारंभी राष्ट्रगीत व प्रार्थना म्हणून प्रत्यक्ष कार्यशाळेस सुरुवात झाली. केंद्रप्रमुख मुदगडे यांनी प्रास्ताविकात दोन वर्षांपासून कोविड प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाले असून, पूर्व प्राथमिक शिक्षण देणारी अंगणवाडी केंद्रेही बंद होती. यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारी बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेली बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झालेले नाही. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी शिक्षण आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हे अभियान मदत करणार आहे. या अभियानात शाळास्तरावर विद्यार्थी आणि पालकांचे मेळावे घेण्यात येणार आहेत.
यावेळी शारीरिक, बौद्धिक, भावनिक विकास, भाषाविकास, गणनपूर्व तयारी यासाठी शिक्षकांनी शाळा परिसरात स्टॉल उभारले होते. या दरम्यान प्रशिक्षणाची उद्दिष्टे, गरज आणि महत्त्व सांगितले. त्यानंतर सर्व विभागाची संयुक्त शिक्षण फेरी काढत शाळा पूर्वतयारी संदर्भाने घोषणा देण्यात आल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या फेरीत प्रत्येक मूल शाळेत जाईल, एकही मूल घरी राहणार नाही. सहज शिकावे हसत हसत, सहज हसावे शिकत शिकत या घोषणा फेरीत देण्यात आल्या. या वेळी विस्तार अधिकारी महाबोले यांनी रेल में छननन हे सर्वधर्म समभाव दर्शवणारे कृतीयुक्त गीत सादर केले. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेवटी केंद्र प्रमुख मुदगडे यांनी शाळापूर्व तयारीतील एकूण सात घटकांविषयी सूक्ष्मपणे माहिती दिली.
गावपातळीवर भरणार मेळावे
प्रशिक्षणात प्रत्येक गावातील सरपंच, माता-पालक संघ, शिक्षणप्रेमी व्यक्ती, स्वयंसेवक, अंगणवाडी ताई, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्या सहकार्याने गाव पातळीवर मेळावा भरण्यात येणार आहे. यासाठी त्यांना मार्गदर्शन करत त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. शिवाय सात गट तयार करत सात टेबलवर स्टॉल मांडण्यात आले. यात विद्यार्थी समवेत पालकांनी स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख विकास पत्र भरून घेतले. यावेळी केंद्रीय मुख्याद्यापक बी. एस. पवार यांनी उपस्थित अंगणवाडीताई यांना संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट दिली. या शाळापूर्व प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी पुष्पलता पांढरे, अर्जुन भुसार, महादेव शिंदे यांनी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.