आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्रा. डॉ. दीपा सावळे म्हणजे विद्या व्यासंगात रमलेल्या ज्ञानयात्री ; प्रा. डॉ. यशवंत पाटणे

परंडा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्य ज्ञानमय व कर्म सेवामय झाले की सारे जीवन प्रकाशमान होते प्राचार्य डॉ. दीपा सावळे विद्या व्यासंगात रमलेल्या ज्ञान यात्री असून त्यांनी ग्रंथ लेखन, संशोधन तसेच प्रशासन या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या अक्षर मुद्रा उमटविल्या आहेत असे प्रतिपादन साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांच्या सोमवार (दि.१) सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ.वसंत सानप, माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, प्रा.डॉ.ए.डी.जाधव, प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव तथा निमंत्रक संजय निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. दीपा सावळे यांनी लिहिलेल्या स्मृतीच्या झरोक्यातून शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय -विकासाची वाटचाल, माझा जीवन प्रवास व उस्मानाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व देव देवता या तीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.डॉ दिपा सावळे यांच्या यशोदीप गौरव ग्रंथाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेेच नूतन प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांचे स्वागत करण्यात आले.

डॉ. यशवंत पाटणे पुढे म्हणाले, सध्याचा काळ हा संक्रमणाचा असून, वाढता धर्म द्वेष, अतिरेकी चंगळवाद व मूल्यहीन राजकारणामुळे संस्कृतीला व लोकशाही व्यवस्थेला तडे जात आहेत. तरुणांच्या पोटापाण्याचे प्रश्न बाजूला पडले आहेत. एकूण समाजाच्या विवेक बुद्धीला ग्लानी आली आहे.अशा काळात ध्येयवादी शिक्षकांनी समाजाला जागे करून सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे.

समाज आणि संस्कृती यांचे वैभव वाढवण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री भवानी शिक्षण संस्थेच्या रूपाने ज्ञानाचे चैतन्य पीठ उभे केले. संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी महाविद्यालयाचा गुणात्मक व रचनात्मक विस्तार केला. गुणवत्तेची कदर असणारे शिक्षण महर्षीच सामान्य माणसातून माणिक मोत्यासारखे रत्ने निर्माण करतात गुणवत्तेचा कस हा जीवनातील कठीण आव्हाने स्वीकारताना लागतो खडतर प्रवास अनुभवाने मिळवलेले यश हीच खरी गुणवत्ता असते गुणवत्तेला संधीची आणि प्रोत्साहनाची गरज असते. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...