आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकाटी:खडकीमध्ये अडीच महिन्यांत कलिंगड लागवडीतून साडेचार लाखांचा नफ

डिकसळ2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील शेतकरी बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेतीतून उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादन खर्च जास्त येत आहे. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी परवडेनाशी होत आहे. आता शेतकरी बांधवांना देखील या गोष्टीची जाणीव झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कळंब तालुक्यातील खडकी गावचे विजयकुमार राखुंडे होय. त्यांनी एक एकर क्षेत्रात कलिंगड लागवडीतून ऐंशी दिवसात तब्बल साडे चार लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे.

कळंब तालुक्यातील खडकी येथील एका नवयुवक सुशिक्षित तरुणाने आधुनिकतेची कास धरून हिवाळयामध्ये कलिंगड लागवड करीत अवघ्या ऐंशी दिवसात तब्बल साडे चार लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. खडकी गावचे रहिवाशी विजयकुमार व राजकुमार राखुंडे या दोन बंधुजवळ वडिलोपार्जित दहा एकर शेतजमीन आहे. विजयकुमार राखुंडे यांना लहानपणापासून शेती करण्याची मोठी आवड होती .शेती क्षेत्रात वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत ते आजवर चांगला नफा कमवत आले आहेत. सध्या राखुंडे बंधूनी एक एकर क्षेत्रात कलिंगड लागवड केली आहे. तर दोन एकर क्षेत्रात केळी बाग लावली आहे, तर उर्वरित सात एकर क्षेत्रात त्यांनी ऊस पिकाची लागवड केली आहे.

या एक एकरवर सात हजार कलिंगडच्या रोपांची लागवड केली. या संपूर्ण लागवडीसाठी सुमारे नव्वद हजार रुपयांचा खर्च आला. कृषी क्षेत्रातील जाणकार ईश्वर भोसले यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी कलिंगडाचे पीक जोपासले, उत्तम मार्गदर्शनाने कलिंगड पिकास योग्य ती ग्रीन प्लँनेटची सेंद्रिय अन्नद्रव्ये दिली . ८० दिवसात कलिंगडाचे चार ते पाच किलो वजनाचे पीक काढणीसाठी तयार केले. या संपूर्ण एककर क्षेत्रावर ४२ टन इतके भरघोस कलिंगडाचे पीक निघाले आहे . राखुंडे यांनी एक एकर क्षेत्रावर शुगर क्विन जातीच्या कलिंगडची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी सहा फुटांचे अंतर सोडून सरी तयार केल्या. लागवड करताना जमिनीवर मल्चिंग पेपरच्या साह्याने आच्छादन केले. त्यामुळे तण वाढत नाही आणि पाण्याचे बाष्पीभवनही प्रतिबंधित होते. पाणीबचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला.

या ४२ टनापैकी ३४ टन कलिंगड व्यापाऱ्यांने बांधावर येऊन चौदा रुपये प्रति किलो या दराने खरेदी केले. आहे. यातून पाच लाख चाळीस हजार इतके उत्पन्न निघाले यातील एक लाख रुपयांचा खर्च वजा जाता निव्वळ चार लाख चाळीस हजार रुपयांचा नफा राखुंडे यांना झाला आहे. व्यापाऱ्याच्या मते, राखुंडे यांनी लावलेल्या शुगर क्वीन या जातीचे कलिंगड चवीला अतिशय गोड असून लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी टिकवणक्षमता अधिक आहे.

अगदी जोखीम पत्करून मिळविले हे यश
कलिंगडचे पीक उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, हिवाळ्यात कलिंगडची लागवड करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. मात्र ही जोखीम अंगीकारून हिवाळ्यात यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले.व त्यातून आम्हाला चार लाख रुपयांचा नफा देखील मिळाला आहे. विजयकुमार राखुंडे , खडकी

बातम्या आणखी आहेत...