आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिक्षकांना शाळेच्या वेळेत झेडपीत येण्यास मनाई; नूतन शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांचे आदेश

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेतेगिरी करणाऱ्या शिक्षकांना शाळेच्या वेळेत जिल्हा परिषद मुख्यालयातील शिक्षण विभागात येण्यास मनाई करण्यात आली असून पदभार स्विकारल्यानंतर नूतन शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. दरम्यान, सोमवारी (दि.१९) त्यांनी पदभार स्विकारल्यावर काही वेळातच शिक्षण विभागाच्या कक्षाच्या लगतच दोन शिक्षक नेत्यांचे जोरदार भांडण झाले. यावेळी एकाकडून वापरली जाणारी भाषा शिक्षकांना शोभणारी नव्हती.

येथे योजना शिक्षण विभागाची सूत्रे नूतन योजना शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी स्विकारली आहेत. त्यांच्याकडे शासनाच्या वतीने येथील प्राथमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेत येऊन हा पदभारही सोमवारी सायंकाळच्या दरम्यान स्विकारला. मंगळवारी (दि.२१) सुधा साळुंके यांनी जिल्हा परिषदेत असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व कक्षांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी काही कर्मचाऱ्यांसोबतही संवाद साधला. विस्तार अधिकारी कक्ष, समग्र शिक्षण विभाग, संगणक कक्ष, आस्थापना, कर्मचारी कक्ष सर्व ठिकाणी साळुंके यांनी भेट दिली. यावेळी कर्मचारी कक्षाची कंपार्टमेंट व्यवस्था तसेच व्हरंड्यातील रंगरंगोटी, पोस्टर रचना पाहून त्यांनी यासाठी पुढाकार घेणारे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे यांचे कौतुकही केले.

दरम्यान, सुधा साळुंके यांनी कोणत्याही नेतेगिरी करणाऱ्या शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शाळेच्या वेळेत येण्यास मनाई केली आहे. १९ शिक्षक संघटनांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रितसर बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांनी कोणत्याही मध्यस्थांमार्फत आपल्या अडचणी न मांडता किंवा कामासाठी मध्यस्थांना न सांगता थेट संबंधित कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी साळुंके यांनी केले.

दोन शिक्षक नेत्यांमध्ये जुंपली
कोणतेही नवीन शिक्षणाधिकारी आल्यानंतर सत्कारासाठी शिक्षक नेत्यांची झुंबड उडत असते. अशीच झुंबड सोमवारी (दि.१९) रात्री शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्यासाठी उडाली होती. नंतर शिक्षण विभागाच्या जवळच दोन वेगळ्या संघटनातील शिक्षक नेत्यांमध्ये एका सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद सुरू झाला.

यामध्ये एका राज्य नेत्याने दुसऱ्या नेत्याला अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरत शिव्यांची लाखोली वाहिली. यामुळे दुसरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना तिसऱ्या राज्य नेत्याने दोघांची समजूत काढून प्रकरण मिटवले. शिव्यांचा आवाज थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षापर्यंत गेला.

बातम्या आणखी आहेत...