आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उपसा पंप बंद; शहरात दोन दिवसांपासून निर्जळी

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उजनी येथील उपसा करणारे दोन पंप संच बंद पडले असून खांडवी येथील स्टार्टर खराब झाल्याने उस्मानाबादचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून शहरातील काही भागात निर्जळी आहे.पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू असून दोन दिवसात पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. नागरिकांना खासगी पाणीपुरवठा करणाऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. दोन दिवसांपासून उजनी येथील उपसा केंद्रावरील पंप बंद पडल्याने त्याची दुरुस्ती आणि स्टँड बाय ठेवलेल्या पंपाला सुरु करण्यास वेळ लागत आहे.

दुसरीकडे दोन ठिकाणी वीज पुरवठा करणाऱ्या केबल कटल्या. खांडवी येथील स्टार्टरमध्येही बिघाड झाला. त्यामुळे शहरात पाणी आलेच नाही. एकाच वेळी तिन्ही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे काही भागात पाणी पुरवठा झाला नाही. शहरातील ज्या भागांना शुक्रवारी पाणी पुरवठा होणार होता, त्या भागाला पाणी मिळू शकले नाही.

त्या भागात निर्जळीचा पाचवा दिवस उजाडला. मात्र, पाणीच नसल्याने पालिकेची पाणीपुरवठा करण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी काही नागरिकांना खासगी टँकर अथवा पाणी पुरवठा करणाऱ्या लोकांचा सहारा घ्यावा लागत आहे.

बोअर असणाऱ्यांना दिलासा
शहरात ज्यांच्याकडे बोअर आहे, त्यांची तात्पुरती गरज भागवली जात आहेत. मात्र, ज्यांच्याकडे बोअर नाही, अशा नागरिकांना खासगी टँकर अथवा पाणी पुरवठा करणाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत असल्याचे दिसून येत आहेत. पिण्यासाठी जार चाही वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत.

लवकरच मिळणार पाणी
शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या उपसा केंद्रासह अन्य ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्यास अडथळा येत आहेत. दुसरीकडे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात येत असून आज कोणत्याही परिस्थिती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी सहकार्य करावे. - हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी. नगरपरिषद.

बातम्या आणखी आहेत...