आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाकंभरी पाैर्णिमेदिनी शुक्रवारी (६ जानेवारी) दुपारी १२ वाजता यजमान श्रीराम कुलकर्णी यांनी सपत्नीक वैदिक मंत्रोच्चारात होमकुंडात पूर्णाहुती दिली. त्यानंतर घटोत्थापनाने तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली. घटोत्थापनानंतर गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेले नवरात्राचे उपवास सोडण्यात आले.
तुळजाभवानी मंदिरातील गणेश ओवरीतील होमकुंडात यजमान श्रीराम कुलकर्णी यांनी वैदिक मंत्रोच्चारात कोहळ्याची पूर्णाहुती दिली. या वेळी महंत वाकोजीबुवा, हमरोजीबुवा, मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, शासकीय उपाध्ये बंडू पाठक यांच्यासह अनंत कोंडो, श्रीराम अपसिंगेकर आदी ब्रह्मवृंदासह पुजारी, भाविकांची उपस्थिती होती. पूर्णाहुतीनंतर घरोघरी घट उठवण्यात येऊन नवरात्राचे उपवास सोडण्यात आले. तत्पूर्वी पहाटे चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले, तर सकाळी ६ वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारतीनंतर अंगारा काढण्यात आला. सायंकाळी अभिषेक पूजेनंतर रात्री उशिरा छबिना मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी (७) दुपारी महाद्वारनजीक सामल धर्मशाळेत अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.