आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्थिर शासन:मेडिकल कॉलेज ऑक्सिजनवर, यंदाच्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह ; अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या

उस्मानाबाद / चंद्रसेन देशमुख14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी मिळाली. मात्र प्रत्यक्षात यावर्षीपासून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होण्यासारखी सद्यस्थिती नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी एनएमसीकडून (राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून) अंतिम मंजुरीची आवश्यकता आहे.ही समिती येत्या आठवड्यात सरप्राइज भेट देऊ शकते. मात्र, त्यासाठीची पूर्वतयारी झालेली नाही. अधिव्याख्याता,निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत. प्रयोगशाळा साहित्य खरेदी शासन स्तरावर खोळंबली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला समितीकडून हिरवा कंदील मिळेल का,याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

महाविकास आघाडी सरकारने १३ जानेवारी २०२१ रोजी उस्मानाबादला १०० क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी दिली.त्यानंतर २७ जानेवारी २०२१ रोजी पद निर्मितीला मंजुरी देण्यात आली.तात्पुरत्या स्वरूपात तातडीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये सामंजस्य करार होऊन जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह अन्य जागा वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात आली.तसेच गट नंबर ९ व १० मधील १६ एकर व गट नंबर ४२६ मधील २० एकर, अशी ३६ एकर जमीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या नावावर करण्यात आली आहे.

करारापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून जिल्हा रूग्णालयाच्या संपूर्ण परिसरावर वैद्यकीय महाविद्यालयाचे फलक लागले आहेत. यावर्षीपासून एमबीबीएसचे प्रवेश सुरू व्हावेत, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची टीम काम करत आहे. मात्र,प्रत्यक्षात प्रवेश सुरू होण्यासाठी एनएमसी समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.ही समिती भेट देऊन पाहणी करेल, त्यानंतर त्रुटी न आढळल्यास प्रवेश सुरू करण्यास मान्यता दिली जाऊ शकते. मात्र पूर्वतयारी म्हणून आवश्यक असलेल्या बाबींमध्ये पदभरतीसह अनेक बाबी अपूर्ण आहेत. या पार्श्वभूमीवर समितीकडून मंजूरी मिळेल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकंदर राजकीय अस्थिरता, खात्याला मंत्री नसणे आदी बाबींमुळे शासन स्तरावरून प्रक्रिया रखडली असून, त्यामुळे यंदा महाविद्यालयाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता कमी आहे.

साहित्य खरेदी प्रक्रिया सुरू
प्रयोगशाळेसह महाविद्यालयासाठी लागणाऱ्या बाबींची तयारी पूर्ण झाली.पदाच्या नियुक्त्या शासन स्तरावर प्रक्रियेत आहेत तसेच प्रयोगशाळा साहित्य खरेदीची प्रक्रियाही सुरू आहे. शासनाकडे नियमित पाठपुरावा सुरू आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन समितीकडून हिरवा कंदील मिळेल, अशी आशा आहे.काही वेळा त्रुटींच्या अधीन राहून मान्यता दिली जाते.
-डॉ. संजय राठोड, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.

सत्ता बदलानंतर उदासीन यंत्रणा
सत्ताबदलानंतर यंत्रणा उदासीन दिसत आहे. एनएमसीच्या मुद्द्यांची पूर्तता गरजेची आहे. निवड मंडळाने विविध पदांसाठी मुलाखंती घेतल्या. मात्र शासनाकडून त्याला मंजुरी मिळाली नाही. साहित्य खरेदीची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे.
-कैलास पाटील, आमदार.

प्रयोगशाळा उभारली, साहित्यच नाही : वैद्यकीय महाविद्यालयाची तातडीने म्हणजे यावर्षीपासूनच सुरूवात व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयाला जिल्हा रूग्णालयाची कोविड इमारतही तातडीने उपलब्ध करून देण्यात आली. या इमारतीत यावर्षीपासून महाविद्यालय सुरू करता येईल, अशी तयारी सुरू झाली. प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्ग खोल्यांसह अधिष्ठातांचे कार्यालयही सुरू झाले. मात्र, प्रयोगशाळा उभारली तरी शासनाकडून त्यासाठीची यंत्रसामग्री, साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...