आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद गतीने निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडून समाधान तक्रार निवारण अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन दिले आहे. ते अँड्रॉइड मोबाइलवर डाउनलोड करता येते. डाउनलोड केल्यावर नागरिकांनी त्यात स्वत:ची नोंदणी करायची आहे. मोबाइल नंबर व ओटीपीद्वारे नागरिकांची पडताळणी होते. त्यानंतर नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात.
आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१५) ऑनलाइन पद्धतीने या अॅपचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व इतर अधिकारी उपस्थित होते.
1 तक्रार दाखल करताना थोडक्यात तपशील व कागदपत्र अपलोड करुन संबंधीत विभागाला पाठवता येतील.
2 तक्रार पाठवल्यानंतर तक्रारीचा युनिक नंबर तयार होईल, तो संबंधीत नागरिकाला एसएमएसद्वारे कळवला जाईल.
3 नागरिक तो तक्रार क्रमांक वापरुन तक्रारीची स्थिती पाहू शकतात. संबंधीत विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे नागरिकांना मिळेल.
4 यात सर्व विभागातील जिल्हास्तरीय प्रमुखांचे मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली.
5 संबंधीत विभागांच्या अधिनस्त कार्यालये, अधिकाऱ्यांची नोंदणी व त्यात बदल करण्याची सुविधा जिल्हास्तरीय विभागप्रमुखांना लॉगीनमध्ये उपलब्ध केली आहे.
6 युजर आयडी, पासवर्ड एसएमएस व ई-मेलद्वारे पाठवले. तक्रार मिळाल्यानंतर संबंधित विभागामार्फत निवारणाची कार्यवाही करण्यात येईल.
प्रतिक्रियेनुसार कार्यालयांची कार्यक्षमता निश्चिती
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण झाल्यास संबंधित विभागाने १५ दिवसांच्या आत लेखी उत्तर समाधान अॅपवर सादर केल्यावर तक्रार निकाली काढण्यात येईल. निकाली काढलेल्या तक्रारी संबंधी नागरिकांना प्रतिक्रिया देता येते. नागरिक समाधान किंवा असमाधान पर्याय निवडून शेरा देतील. नागरिकांच्या प्रतिक्रियेनुसार कार्यालयांची कार्यक्षमता, क्रमवारी निश्चित होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.