आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैधरीत्या सावकारी करणाऱ्या ४ सावकारांच्या मालमत्तांवर निबंधक कार्यालयाने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तसेच सावकाराचे सराफा दुकानही सील करण्यात अाले. परंडा तालुक्यातील कुंभेफळ व राेसा येथील पीडित नागरिकांच्या तक्रारीवरून उस्मानाबाद, पुणे व साेलापूर विभागाच्या सहायक निबंधक पथकाने २१ रोजी एकाच वेळी परंडा, बार्शी व पुणे येथे छापे मारून ही कारवाई केली.
परंडा तालुक्यातील रोसा येथील गणिता गव्हाणे यांचे वडील सखाराम बनसोडे यांनी सर्व्हे नं. ३७ मधील काही जमीन अवैध सावकार अशोक लंगोटे (रा.उपळाई, ता.बार्शी) व झाकीर पटेल (रा.परंडा) यांना गहाणखत करून देऊन व्याजाने पैसे घेतले होते. सावकारास पैसे परत करूनही जमीन परत देत नसल्याने मुलगी गणिता यांनी परंडा येथील सहायक निबंधक कार्यालयात २८ नोव्हेंबर २०१९ मध्ये तक्रार केली होती. त्यानुसार सहायक निबंधक पथकाने अशोक लंगोटे यांचे परंडा शहरातील सराफा दुकान सील केले तसेच बार्शी शहरातील लोखंड गल्लीतील सराफ दुकानाची व उपळाई येथील घराची झाडाझडती घेतली.
त्यात काही कागदपत्रे मिळाली असून दुसऱ्या पथकाने अवैध सावकार झाकीर पटेल यांच्या परंडा येथील दुकानात व घरी छापे टाकून स्टॅम्प पेपर, खरेदीखत, धनादेश जप्त केले. परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील संदिपान बारसकर व ब्रह्मदेव बारसकर यांनी अवैध सावकारी करणारे मारुती राऊत व पत्नी सरस्वती राऊत (ह.मु.पुणे) यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले व व्याजासह परत करूनही सतत त्रास देत असल्याने तक्रार दाखल केली होती.
दोन विभागांची तीन जिल्ह्यांत कारवाई
लातूर व पुणे विभागांतर्गत उस्मानाबाद येथील जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक संजय जाधव यांच्या दोन पथकांनी परंडा शहरात अशोक लंगोटे यांच्या सराफा दुकानात छापा टाकत दुकान सील केले. झाकीर पटेल यांच्या घरी व दुकानात छापे टाकले. तसेच सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या पथकाने बार्शीतील अशोक लंगोटे यांच्या दुकानावर व उपळाई येथील घरी छापे टाकले. पुणे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांच्या पथकाने भोसरी येथे मारुती राऊत यांच्या घरी छापे टाकले.
तालुक्यात परवानाधारक सावकारांची संख्या १९
तालुक्यात एकूण परवानाधारक १९ सावकार आहेत. त्यापैकी १४ सावकारांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण केले आहे, तर ५ जणांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अशोक लंगोटे यांनी सावकारकीच्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही व रद्द करावा असा अर्ज दिला आहे. अवैध सावकार सामान्य आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांची पिळवणूक करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.