आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाणलोट व्यवस्थापनात जल, जमीन, जंगल, जनावरे व जनसंख्या या नैसर्गिक संसाधनांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक आहे. उस्मानाबाद जिल्हा हा कृष्णा व गोदावरी नदी खोऱ्याच्या रिज लाइनवर वसला आहे. त्यामुळे येथील पावसाचे पाणी या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यात वाहून जाते. त्यामुळेच येथे पंच जकार व्यवस्थापन आवश्यक आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ७५० मिमी पाऊस पडतो. म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रावर एवढा पाऊस झाल्यास ७५ लाख लिटर पाणी आपणास निसर्गाकडून मोफत मिळते. या पाण्याचे संवर्धन केल्यास त्यापासून या भागाचा शाश्वत विकास साधता येईल, असे मत विद्यापीठ उपपरिसरातील जल व भूमी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली जल व भूमी व्यवस्थापन विभाग व स्वयंम शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या महिलांसाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी “पंच जकार व्यवस्थापन’ विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. नितीन पाटील म्हणाले की, धाराशिव हे नाव देखील धारा म्हणजेच पाऊस आणि शीव म्हणजे गावाची सीमा म्हणजेच दोन्ही बाजुला होणाऱ्या पावसाच्या रनऑफ मुळे दिले गेले आहे.
दरम्यान, विद्यापीठ उपपरिसरात जल व भूमी व्यवस्थापन विभागात पंच जकार व्यवस्थापनावर दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. दरम्यान प्रदीप गारोळे व प्रकाश पाटील यांनी प्रात्यक्षिकासह उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, कार्यशाळेत महिलांना पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाबाबत प्रा. डॉ. नितीन पाटील (विभागप्रमुख, जल व भूमी व्यवस्थापन विभाग), प्रदीप गारोळे (संचालक, यशदा पुणे), प्रकाश पाटील (पाणलोट प्रशिक्षक) यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक तथा प्रोफेसर डॉ. डी. के. गायकवाड होते.
संदेश संपूर्ण जिल्ह्यात पोहोचेल
एस. एस. पी. या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातील संदेश १०० गावांमधून आलेल्या शंभर शेतकरी महिलांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात पोहोचेल, असा आशावाद प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्त केला. त्यानंतर शेतकरी महिलांच्या प्रश्नांचे निरसन डॉ. नितीन पाटील यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.