आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलाने क्रिकेटचे मैदान गाजवावे म्हणून वडिलांच्या मृत्यूनंतर आईकडून प्रोत्साहन; तुळजापूरच्या राजवर्धन हंगरगेकरची चमकदार कामगिरी

उस्मानाबाद / चंद्रसेन देशमुखएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईचा जिजाऊ पुरस्काराने होतोय सन्मान; राजवर्धनची वर्ल्डकपसाठी भारतीय संघात वर्णी

राजवर्धन हंगरगेकरने क्रिकेटमध्ये पाकिस्तानला धू-धू धुतले, अशी बातमी झळकत असताना सबंध भारताची मान गर्वाने उंचावत होती. हा तोच राजवर्धन होता ज्याच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी राजवर्धनने एकदा तरी भारतीय संघाकडून खेळावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. राजवर्धन एवढ्यावर थांबलेला नाही. तो १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून वर्ल्डकपसाठी मैदानात उतरला आहे. १४ तारखेपासून ही स्पर्धा होत आहे. वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी आई अनिता यांनी त्याला प्रोत्साहित केले. त्याला घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन उस्मानाबादच्या जिजाऊ जन्मोत्सव समितीने राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर केला. तिकडे भारतीय संघात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या मातेला राजमाता पुरस्काराचा बहुमान मिळतो आहे. युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा योग जुळून आला आहे.

राजवर्धनच्या यशाची कहाणी...
तुळजापूर येथील राजवर्धन याची १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाकडून वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला पराभूत करत भारतीय क्रिकेट संघाकडून बजावलेली मोलाची भूमिका, यामुळे राजवर्धन अधिक चर्चेत राहिला. त्याने यादरम्यानच्या ४ सामन्यांत ९ बळी घेत ९७ धावा केल्या आहेत. सर्वोत्तम गोलंदाज खेळाडू म्हणून ओळख असलेल्या राजवर्धनने पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यात अवघ्या २० बॉलमध्ये ३३ धावा करून कुशलता दाखवली. १४ जानेवारीपासून होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात राजवर्धनही उत्तम भूमिका बजावेल, अशी देशाला आशा आहे. उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या राजवर्धनचा क्रिकेटमधला हा प्रवास रंजक आणि रोचक आहे. राजवर्धनच्या कुटुंबाकडे तुळजापूरमध्ये शैक्षणिक संस्था आहे. शिवाय काही प्रमाणात राजकीय पार्श्वभूमीही आहे. मात्र त्याने यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, अशी इच्छा त्यांच्या माताेश्री अनिता हंगरगेकर यांची होती. त्यामुळे त्यांनी राजवर्धनचे वडील सुहास हंगरगेकर यांच्याकडे आग्रह धरत उस्मानाबादला वास्तव्य केले. राजवर्धन यांची बहीण सुमित्रा राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू आहे, तर राजवर्धनचे मामा क्रिकेटपटू असल्याने त्यानेही याच क्षेत्रात करिअर करावे, भारतीय संघाकडून खेळावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. उस्मानाबादेत राजवर्धनला राम हिरापुरे यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण मिळू लागले. त्यानंतर त्याने पुण्यात प्रशिक्षण घेतले.

दरम्यानच्या काळात १२ जुलै २०२० रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर राजवर्धनवर कुटुंबाची जबाबदारी आली. त्या वेळी त्याचे वय १७ वर्षे होते. मात्र, अशा दु:खाच्या प्रसंगातही आई अनिता यांनी राजवर्धनला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाचा मार्ग दाखवला. न डगमगता त्या राजवर्धनच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या आणि वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याला सज्ज केले. वडिलांच्या मृत्यूनंतरही घरी न बसता राजवर्धन मैदानावर गेला. अवघ्या चार महिन्यांतच भारतातील वेगवेगळ्या रणजी करंडक स्पर्धा जिंकत त्याने मैदान गाजवायला सुरुवात केली. १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाकडून वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. डिसंेबरपासून तो देशाबाहेर आहे. आईने क्रिकेटसाठी दिलेले प्रोत्साहन आणि मामा अजयकुमार देशमुख (मानेगाव, ता.माढा) यांच्या पाठबळामुळे राजवर्धन खंबीरपणे मैदानात उतरला आहे.

वर्ल्डकप घेऊनच ये, आईच्या शुभेच्छा!
राजवर्धन आता वर्ल्डकप स्पर्धेसाठी खेळणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल आणि भारताला वर्ल्डकप मिळवून देईल, असा त्याला विश्वास वाटतो. त्याच्यासोबतच देशाला हा सन्मान मिळावा, यासाठी त्याच्या मातोश्री अनिता यांनीही प्रार्थना केली. तसेच वर्ल्डकप घेऊनच ये, अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...