आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये रे पावसा:उस्मानाबादेत वरुणराजाची तुरळक हजेरी,रस्ते ओलेचिंब ; भूममध्येही पेरणीयोग्य ओल नसल्याने चिंता

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्राच्या शेवटी वातावरणात बदल झाला असून शनिवारी (दि.१८) उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील येडशी, उमरगा, भूम, वाशी तालुक्यांतील काही भागात दमदार व तुरळक पाऊस झाला आहे. काही भागात नुसतेच पावसाचे काळे ढग घोंगावत आहेत. जून महिना अर्धा पूर्ण होत आला तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज यंदा पुन्हा फोल ठरला असून जून महिना अर्धा पूर्ण होत आला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही. शनिवारी (दि.१८) दुपारी १ वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली होती. गतवर्षाच्या तुलनेत १८ जूनपर्यंत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून बी-बियाणाच्या दुकानातील गर्दी कमी होत असल्याचे दिसत आहे. २०२१ मध्ये १८ जूनपर्यंत ९०.६ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्या तुलनेत यंदा १८ जूनपर्यंत ४६.१ मिमी म्हणजेच गतवर्षाच्या तुलनेत यंदा ४४.५ मिमी पाऊस कमी झाला आहे. असमतोल पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असून तुरळक पावसावर पेरलेल्या बियाणाला उगवण्यास बळ मिळत नाही. यंदा राज्यात चार दिवस अगोदर मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, १८ जूनपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याच भागात दमदार पाऊस झाला नाही. काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात काहीप्रमाणात थंडवा जाणवत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. सध्या दुपारपर्यंत तीव्र उन्हाचा कडाका जाणवतो.

दुपारनंतर काळे ढग दाटून येतात. मात्र, काही ठरावीक ठिकाणीच तुरळक पाऊस होता. यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटाने मेटाकुटीला आला आहे. यंदा तरी वेळेवर पाऊस झाल्यास वेळेत पेरणी करून गतवर्षाची तूट भरून काढण्याची अपेक्षा बळीराजाची होती. मृग नक्षत्र जवळपास सर्वच कोरडे जात असल्याचे दिसत आहे. गतवर्षाच्या तुलनेत ४४.५ मिमीने पाऊस कमी आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात तुरळक मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असून बियाणे उगवण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्वच पिकांची पेरणी करता येणार गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाला उशीर होत असल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीला उशीर झाल्यास अनेक पिकांची पेरणी केल्यास अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. मात्र, पुढच्या आठवड्यापर्यत सर्वच पिकांची पेरणी करता येणार असल्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, १ जुलैनंतर शेतकऱ्यांनी उडीद, मुगाची पेरणी करण्याऐवजी अन्य पिकांची पेरणी करण्याची गरज आहे. १ जुलैनंतर उडीद, मुगाची पेरणी केली तर उतार कमी मिळतो. यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. येडशीत हलक्या सरी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीप्रमाणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन अर्धा महिना उलटून गेला तरी पाऊस नसल्याने चिंता निर्माण झाली होती.

बातम्या आणखी आहेत...