आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध समस्या सोडवून नागरी योजनांना दिलेली स्थगिती तत्काळ उठवण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना निवेदन देऊन साकडे घातले. तसेच याची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला.
शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद शहरातील नगर पालिका अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान योजना, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना या विकासकामांना ३० मार्च २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मात्र, याची निविदा प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडून जाणूनबुजून निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. या विकास कामांच्या निविदा उघडून विकासकामांचा कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देणे आवश्यक आहे. या प्रकरणी न.प. सार्वत्रिक निवडणुकीसाठीही आदर्श आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे ही कामे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील असल्यामुळे कामे पूर्ण होऊन ३१ मार्च २०२३ पर्यंत निधी खर्च पूर्ण होणे अपेक्षित आहे. आता यासाठी केवळ तीन महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या कामाबाबत कार्यवाही वेळेत न झाल्यास निधी अखर्चित राहून विकासकामांना अडथळा निर्माण होईल.
यासाठी या योजनेअंतर्गत मंजूर कामांना तात्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावेत. तसे न झाल्यास प्रशासन व राज्य शासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ डिसेंबर पासून मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेनेचे सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडेे, प्रवीण कोकाटे, गणेश खोचरे, प्रदीप घोणे, पंकज पाटील व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.