आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भूम पोलिसांकडून रोडरोमिओंना चोप, हे चित्र उस्मानाबादेत कधी दिसणार?

उस्मानाबाद / भूम10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम शहरातील शाळा, महाविद्यालयांसह, खासगी क्लासेस व बस स्टॉपवर तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी धरपकड केली आणि त्यांना जागेवरच चोप दिला. ही कारवाई सोमवारी (दि.२१) वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आल्यामुळे विद्यार्थिनींसह, पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, उस्मानाबाद येथे जिल्ह्याच्या ठिकाणी टवाळखोरी प्रचंड वाढलेली असताना देखील पोलिसांची बघ्याची भूमिका असल्याने हे चित्र उस्मानाबादेत कधी दिसणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

भूम शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालय, श्री गुरुदेव दत्त हायस्कूल, रवींद्र हायस्कूल यासह खासगी क्लासेसच्या परिसरात टवाळखोर रोडरोमिओ मुलींची छेडछाड काढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्याने पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पोलिसांचे पथक तयार करून शहरातील महाविद्यालय, शाळा, खासगी क्लासेस व बस स्टँड परिसरात रोडरोमिओंवर करडी नजर ठेवून कारवाई केली. शहरातील श्री गुरुदेव दत्त हायस्कूलच्या परिसरात विद्यार्थिनींची टिंगलटवाळी करणाऱ्या तरुणांची धरपकड करण्यात आली. यावेळी शाळेशी संबधित नसलेल्या काही रोडरोमिओंना चोप देऊन समज दिली. अचानक झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे रोडरोमिओंनी धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. यातील काहींना महाविद्यालय, शाळा, खासगी क्लासेस व बस स्टँड परिसरातच चोप देऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस स्टेशनने रोडरोमिओंवर कारवाई चालू केल्याने विद्यार्थिनींना शाळेत जाणे-येणे सुकर झाले असून, त्याबाबत परिसरातील पालकांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिस बेफिकीर
उस्मानाबादेत दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मुली येत आहेत. मात्र बसस्थानकापासून जिजाऊ चौक परिसरापर्यंत शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस असलेल्या भागात टवाळखोरांकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु शिक्षण बंद होण्याच्या भीतीने मुली तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. टवाळखोरांना जाब विचारणाऱ्यांना मारहाण करण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यातून अनेकदा दोन गटांमध्ये टोकाचे वाद झाले आहेत. मात्र, पोलिस कठोर भूमिका घेताना दिसत नाहीत. उस्मानाबाद पोलिसांनी भूम पोलिसांचे अनुकरण करून शहरातील टवाळखोरी मोडीत काढावी, अशी अपेक्षा येथील मुलींचे पालक व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

साध्या वेशात गस्त
महाविद्यालय, शाळा, क्लासेस व बसस्टॅन्ड परिसरात साध्या वेषात पोलीसांची गस्त चालू केली आहे. पालकांनी, मुलींनी कोणतीही भिती न बाळगता शिक्षण पूर्ण करावे. मुलींच्या छेडछाडीबाबत कोणतीही घटना आपल्या निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. यापुढे रोडरोमिओंची गय केली जाणार नाही.
-मंगेश साळवे, पोलिस निरीक्षक, भूम.

बातम्या आणखी आहेत...