आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वसुली:तामलवाडी येथील टाेलनाक्यावर पोलिसांकडून वाहनधारकांची लूट

तामलवाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांची तामलवाडी टोलनाक्याजवळ महामार्ग पोलिसांकडून लूट सुरू असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांना अडवून वाहतूक नियमांच्या नावाने पावती न देता दंड वसूल करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. महामार्ग पोलिसांकडून होत असलेल्या या अवैध वसुलीमुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत.

सोलापूर-तुळजापूर या महामार्गावरून तुळजापूरला श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून दररोज लाखो भाविक येतात. मात्र, प्रवासादरम्यान त्यांना तामलवाडी टोलनाक्याजवळ पोलिसांचा नाहक मनस्ताप सहन करावा लागताे. वाहन तपासणीच्या नावाखाली पोलिसांकडून रात्री-अपरात्री अवैधपणे वसुली केली जात आहे. वाहनधारकांची लूट करणारे पोलिस म्हणजे वरिष्ठांच्या अलिखित परवानगीने चालणारे ‘चालते बोलते’ टोलनाके असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर मंदिरे खुली झाल्याने भाविक उत्स्फूर्तपणे देवी-देवतांचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, पोलिसांच्या वसुली मोहिमेमुळे भाविक वैतागले आहेत.

संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन भाविकांची होणारी लूट थांबवावी व दोषी कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...