आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:संबळ, हलगीच्या तालावर जलयात्रेचा जल्लोष; 12 हजार भाविकांना महाप्रसाद

प्रदीप अमृतराव | तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोक्यावर कलश घेऊन जलयात्रेत सहभागी झालेल्या पाच हजारांवर महिला, पुढे ढोल-ताशा, संबळ, हलग्यांचा ताल आणि वारू खेळत देवीभक्त, आराध्यांचा सुरू असलेला जल्लोष... तुळजापुरात मंगळवारी सकाळी हे उत्साहपूर्ण, चैतन्यमय चित्र होते. निमित्त होते शाकंभरी नवरात्रोत्सवातील जलयात्रेचे. यात्रेत सहभागी महिलांनी पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी कंुडातील पवित्र जलधारा आणून कुलस्वामिनी, शक्तिदेवता तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात अर्पण केल्या. जलयात्रेनिमित्त तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयाेजन केले हाेते. यात ३२५ सदस्यांनी स्वखर्चातून १२ हजार भाविकांची व्यवस्था केली होती.

दुपारी देवीची शेषशायी अलंकार पूजा मांडण्यात आली. शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमान श्रीराम कुलकर्णी यांनी सपत्नीक इंद्रायणी देवीच्या आरतीने सकाळी ७:३० च्या सुमारास जलयात्रेला प्रारंभ केला. या वेळी महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा यांच्यासह मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, सिद्धेश्वर इंतुले, अभियंता प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण यांच्यासह पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ आदी उपस्थित होते. हजारो सुवासिनींनी इंद्रायणीचे पवित्र जलाने भरलेले जलकुंभ डोक्यावरून वाजतगाजत मंदिरात आणले. मंदिर संस्थानच्या वतीने सुवासिनींची खणा-नारळाने ओटी भरण्यात येऊन दुपारी १२ च्या सुमारास जलयात्रेचा समारोप करण्यात आला.

हत्ती, अश्वांसह बैलगाडीचाही मिरवणुकीत होता सहभाग काही वर्षे खंडित शाकंभरी नवरात्र महोत्सवाची परंपरा १९६८ मध्ये पुन्हा सुरू केली, शाकंभरी-शाक म्हणजे भाज्या, फळे. शाकंभरी देवी कर्नाटकात असल्याचे सांगितले जाते. दुष्काळात लोकांनी देवीला साकडे घातले व मुबलक पाऊस पडला, धनधान्याच्या राशी भरल्या, अशी आख्यायिका आहे.

३२५ भक्तांकडून महाप्रसाद आयोजन तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी १२ ते सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या महाप्रसादाचा जवळपास १२ हजार भाविकांनी लाभ घेतला. प्रक्षाळ मंडळाच्या महाप्रसादाचे या वर्षी १६ वे वर्ष होते. मंडळाच्या वतीने महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गणी न गोळा करता मंडळाच्या ३२५ सदस्यांनी स्वतःच्या खर्चातून महाप्रसादाचे आयोजन केले. अजित क्षीरसागर, सुनील साळुंके, रत्नदीप मगर, नीलेश रोचकरी, अनंत सावंत, अमर चिवचिवे, दादासाहेब खपले, ऋषिकेश वऱ्हाडे, युवराज तावसकर, बब्रुवान पलंगे, गणेश घोलकर, मनोज माडजे आदींनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...