आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आदर्श शिक्षण संस्थेला 200 खाटा सुविधेचे हॉस्पिटल मंजूर; सहा महिन्यांमध्ये सेवा सुरू होणार असल्याची संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांची माहिती

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला केंद्राकडून विशेष बाब म्हणून सहकार तत्त्वावरील दोन रूग्णालये मंजूर झाली आहेत.त्यापैकी २०० खाटांचे एक रुग्णालय आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाला मंजूर झाले असून, या रुग्णालयासोबत संशोधन होणार आहे. महिनाअखेरीस कामाला सुरुवात होणार असून, ६ महिन्यात सेवा सुरू होतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.

आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योगात पिछाडीवर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याची देशातल्या ११५ मागास जिल्ह्यात गणना होते. राज्यात गडचिरोली, नंदुरबार व उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश असून, देशातील यादीमध्ये १५ व्या क्रमांकावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा अनुषेश भरून काढण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. सामान्यांना मोफत आणि मध्यमवर्गीयांना माफक दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सहकार तत्त्वावरील दोन रूग्णालये आणि रिसर्च सेंटर मंजूर केली आहेत. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हे रूग्णालय बार्शीरोडवरील के.टी.पाटील फार्मसी कॉलज परिसरात उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाल्याचे सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, फार्मसी, नर्सिंग महाविद्यालय तसेच पॅरामेडिकल कोर्सेस फार्मसीचे संशोधन केंद्र तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता पाहून केंद्रीय सहकार मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून व विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनामध्ये वाव मिळण्यासाठी केशवराज मल्टीस्पेशालिटी को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटलला व संशोधन केंद्रास मान्यता दिली आहे.हे केंद्रीय रुग्णालय मूल्यांकन प्राधिकरण नवी दिल्ली यांचे मानकाप्रमाणे २०० आंतररुग्ण क्षमतेचे रुग्णालय व शैक्षणिक व संशोधन केंद्र आहे.

या सेवा मिळणार
हॉस्पिटलमार्फत बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग या दोन्ही सेवा चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. यामध्ये अंतर रुग्ण विभागामध्ये वैद्यकीय तसेच सर्जरी, बाल रोग तज्ञ, स्त्रीरोग व प्रसूती विभागातील अस्थीरोग विभाग तसेच हृदयरोग, न्यूरोलॉजी, किडनी तज्ञ, श्वास रोग तज्ञ, इत्यादी आजारावर देश व विदेशातील अत्याधुनिक उपलब्ध तंत्रज्ञानाद्वारे निदान व उपचार केले जातील. त्याचबरोबर एम.आर.आय., कलर डॉपलर सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, या सर्व अद्यावत मशीन उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...