आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील लोकशाही धोक्यात येत आहे. यामुळे लोकांनी अशा लोकप्रतिनिधीला धडा शिकवण्याचे काम करावे. त्यासाठी आगामी निवडणुकीत मशाल पेटवून कपट कारस्थान करणाऱ्यांना उजेड दाखवावा, असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी (दि.६) परंडा येथील विराट सभेत बोलताना केले.
आठवडा बाजार मैदानात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाप्रबोधन यात्रेची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व लोक उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकर बोरकर, शरद कोळी, जिल्हा प्रमुख गौतम लटके, शिवसेना युवा नेते रणजित पाटील, तालुका प्रमुख मेघराज पाटील, विश्वजीत पाटील, दिलीप शाळू, चेतन बोराडे, सेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.
पुढे बाेलताना अंधारे म्हणाल्या की, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना सर्वकाही दिले आहे. असे असताना त्यांना सत्तेत ‘दिल मांगे मोर’ पाहिजे होते. तानाजी सावंत यांच्यासारख्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाप्रबोधन यात्रा असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत डॉ. तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त व्हिडिओ क्लिप दाखवल्या. सावंत यांची कामापेक्षा बोलण्याची चर्चा जास्त होतेय, अशी टीका उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. जनतेच्या बऱ्याच प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजपा, शिंदे गटावर अंधारे यांनी केला.
सभेतील वक्तव्याची नोंद भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील काही आमदारांवर टीकेची झोड तसेच खोचक टोले लगावले. स्थानिक पोलिसांकडून सभेतील नेत्यांच्या भाषणावर बारीक लक्ष ठेवले जात होते. छायाचित्रणासह भाषणातील वक्तव्याची नोंद केली जात होती. काही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.