आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेफिकिरी भोवणार:सातत्याने सूचना देऊनही आधार अपडेटेशनकडे शाळांचे दुर्लक्ष; जिल्ह्यातील 96 हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिसमॅच, पुढील शिक्षणात अडचणीची शक्यता

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध शाळांतील ९६ हजार ३६६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भात अपडेटेशनच्या सूचना देऊनही काही शाळांकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे २९ हजार ८४९ विद्यार्थ्यांचे आधार कार्डच संकलितच केलेले नाहीत. यामध्ये खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये बनावट पट दाखवून अनुदान लाटण्याचा प्रकार समाेर आला होता. यामुळे विद्यार्थ्यांची खरी संख्या समोर येण्यासाठी शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड घेण्याचे आदेश दिले होते. तसेच शालेय पोषण आहार, गणवेश वितरण व अन्य विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना राबवण्यासाठीही आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला होता. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी आधारकार्ड संकलित करण्यास सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये १२ वी पर्यंतचे दोन लाख ९१ हजार ५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी आतापर्यंत दोन लाख ६१ हजार २०९ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड संकलित करण्यात आले आहेत. याची नोंद स्कुल पोर्टलला ऑनलाईन पद्धतीनेही करण्यात आली आहे. परंतु, स्कूल पोर्टलला तब्बल ९६ हजार ३६६ आधारकार्ड मिसमॅच दाखवली जात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची नावे, जन्मतारखेमध्ये फरक दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांची आधारकार्ड मिसमॅच आहेत. मात्र, अद्यापही ते दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शिक्षण विभागाकडून सातत्याने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शिक्षकांना सूचना देण्यात येत असतात. परंतु, अद्यापही मोठ्या संख्येने आधारकार्ड मिसमॅच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात. दहावीच्या बोर्ड परिक्षेत आधारकार्ड मॅच झाले नाही तर विद्यार्थी परिक्षेला मुकू शकतो.

अनेकांचे आधारकार्डच नाहीत
जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील २९ हजार ८४९ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डचे संकलनच होऊ शकलेले नाही. ही संख्याही अनेक दिवसांपासून मोठ्याप्रमाणात आहे. यासाठीही शिक्षण विभागाने वारंवार सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये अनुदानित शाळांतील ९२७२ तर जिल्हा परिषद शाळांतील ७५३४ जणांचे आधारकार्ड उपलब्ध झालेले नाही.

कार्ड काढण्यासाठी अडचणी
काही पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पालक व शिक्षकांनाही काढता आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे आधारकार्डच उपलब्ध होऊ शकलेले नाही. तंतोतंत व योग्य माहिती भरूनही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आधारच्या पोर्टलवर नोंदवले जाते. परंतु, प्रत्यक्षात कोणत्याही त्रुटी सांगून आधारकार्ड नाकारण्यात येते. मात्र, अशा विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे.

पालकांचेही अपडेशनकडे दुर्लक्ष
काही पालकांकडून आधार कार्डवर असलेले नाव व प्रत्यक्ष नाव सांगत असताना तफावत असते. तसेच जन्मतारीखही चुकीची सांगण्यात येते. शिक्षण विभागाकडून सातत्याने शिक्षकांना सूचना दिल्या जातात. परंतु, पालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्याच्या आधार कार्डचे अपडेटेशन होत नाही. याचा परिणाम पुढील शिक्षणात भोगावा लागतो.

शिष्यवृत्तीसाठी येतात अडचणी
काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना असते. यातून त्यांचा शैक्षणिक खर्च भागेल इतपत त्यांना रक्कम मिळत असते. परंतु, आधारकार्डमध्ये तफावत असेल तर शिष्यवृत्ती मिळण्यासाठीही अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे तातडीने आधारकार्ड संदर्भात माहित उपलब्ध करण्याची सूचना देण्यात येत असते. परंतु, याला प्रतिसाद मिळत नाही.

सीईओंच्या मार्गदर्शनानुसार प्रक्रिया
^राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचा पट बोगस आढळला होता. यामुळे आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून आधारकार्ड देणे व अपडेट करण्यास टाळाटाळ होईल, अशा शाळांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे संबंधित शाळांनी याची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी.
ज्ञानेश्वर मोरे, शिक्षणाधिकारी (प्रा.)

बातम्या आणखी आहेत...