आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनींचा शोध:जिल्ह्यात आणखी मोठे सौर प्रकल्प, पडीक, डोंगराळ जमिनींचा शोध सुरू

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सौर ऊर्जेसाठी अनुकूल वातावरण असलेल्या उस्मानाबादमध्ये या उद्योगातील गंुतवणूक आणखी वाढणार आहे. सौर प्रकल्पासाठी जिल्ह्यात शासकीय पडीक व गायरान जमिनींची माहिती शासनाने मागवली असून, जे शेतकरी अशी जमीन देण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या जमिनींची माहिती सुद्धा कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तलाठ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील माहिती दोन आठवड्यात कळवण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून तसेच खासगी कंपन्यांकडून सौर प्रकल्पांसाठी अशा जमिनींची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

नासा या संशोधन संस्थेच्या दाव्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौरऊर्जा निर्मितीला मोठा वाव आहे. मात्र, तुलनेने सौर ऊर्जेवर आधारित उद्योग कमी आहेत.

कौडगावसह दहीवडीत मेगा प्रोजेक्ट
जिल्ह्यात सध्या ३२५ मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे. शासनाच्या माध्यमातून कौडगावमध्ये ५० मेगावॉटचा प्रकल्प आहे तर सर्वाधिक १०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प तुळजापूरमधील दहीवडी येथे आहे. येडशी, ढोकी, तुळजापूर तालुक्यातील अणदूर, होर्टी, किलज तसेच उमरगा तालुक्यातील मूळज, येणेगूर, भूम तालुक्यातील ईट, कळंब तालुक्यातील शिराढोण, परंड्यातील शेळगाव आदी भागात सौर प्रकल्प कार्यान्वित आहेत.गंुतवणूक वाढली असली तरी या आता शासनानेच या उद्योगासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सरकारी पडीक तसेच गायरान जमिनींचा शोध घेतला जात आहे. प्रत्येक पड जमिनींवर सौर प्रकल्प उभारला जाईल, असे भविष्यातील नियोजन आहे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले असून, त्यात आपल्या जिल्ह्यातील शासकीय तसेच शेतकऱ्यांकडील पडीक जमिनींची माहिती कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक तहसील स्तरावरून तलाठ्यांकडून यासंबंधीची विहित नमुन्यात माहिती मागविण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणची माहिती संकलितही झाली आहे. लवकरच ही माहिती राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे.त्यानंतर सौर उद्योगासंदर्भातील धोरण ठरविले जाईल.थेट शासनाकडून अशा जमिनींवर सौर प्रकल्प उभारले जाणार की खासगी कंपन्यांचा या उद्योगात सहभाग असणार, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, यानिमित्ताने जिल्ह्यातील पडीक, डोंगराळ जमिनींना अच्छे दिन येणार, हे निश्चित.

१ हजार मेगावॅटचे उद्दिष्ट
केंद्र राज्य शासनाच्या सौरऊर्जेसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. शेतकऱ्यांना कृषीपंपासाठीही योजना आहे. शहरी भागात रूफ टॉपसाठीही अनुदान आहे. कौडगाव एमआयडीसीत पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटचा प्रकल्प उभारला. दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० मेगावॉटचा प्रकल्प उभारणार आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठे प्रकल्प कार्यान्वित झाले.यातून सध्या सरासरी ३२५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती सुरू आहे. नजिकच्या काळात एक हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे शासनाचे उद्दीष्ट आहे.

ऊर्जा निर्मितीसोबत रोजगारावर भर
सौर उद्योग क्षेत्रात अपेक्षित गंुतवणूक झाली नाही. आता मात्र या क्षेत्रात मोठी गंुतवणूक वाढविण्यावर भर राहील. आकांक्षित जिल्हा असल्याने निती आयोगही यासाठी सकारात्मक आहे. सौर ऊर्जा निर्मितीसोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याच्या तसेच उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून रोजगारात वाढ होईल. -राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर मतदारसंघ.

सौर जिल्हा कागदावरच, उद्योगांमध्ये वाढ नाही
राज्य शासनाने उस्मानाबाद जिल्ह्याला सौर जिल्हा म्हणून घोषित करून १६ वर्षे उलटली. मात्र जिल्ह्यात या क्षेत्रात अपेक्षित गंुतवणूक झालेली नाही किंवा सौर जिल्ह्यासाठी अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. आपरंपारिक ऊर्जा स्त्रोतातून ऊर्जा निर्मितीवर मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेवर भर दिला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...