आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सर्वात मोठा सीना-कोळेगाव सर्वात सलग तिसऱ्या १०० टक्के भरला. शनिवारी (दि.२४) दुपारी प्रकल्प तुडुंब भरला. पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. तालुक्यातील खासापुरी, चांदणी मध्यम प्रकल्प तसेच निम्न खैरी बृहत लघु प्रकल्प १०० टक्के भरले. यामुळे सिंचनात वाढ होणार आहे. तालुक्यात पर्जन्यमान कमी असले तरी नगर भागात झालेल्या पावसामुळे सीना, नळी व खैरी या तीन नद्यांचा संगम धरण क्षेत्रातील डोंजा परिसरात होतो. तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निम्नखैरी प्रकल्प भरला असून सांडव्यातील पाणी सीना नदीत येत आहे.
यामुळे सीना-कोळेगावच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. दरम्यान नदी काठाच्या गाव व शेतवस्तीत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंडा तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने आवर्षणग्रस्त व दुष्काळी भाग म्हणून ओळख असल्याने दळणवळणाची साधने कमी प्रमाणात होती. परंतु, सर्वात जास्त मध्यम प्रकल्प तालुक्यात आहेत. २००७ मध्ये जिल्ह्यात सर्वात मोठा ५.३० टीएमसी क्षमतेचा सीना-कोळेगाव उभारला गेला, त्यामुळे परंडा तालुक्यातील ६८०० हेक्टर व करमाळा तालुक्यातील ३४०० हेक्टर अशी एकूण १०२०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, कालव्याची कामे पुर्ण होण्याची आवश्यकता आहे.
सीना-कोळेगाव प्रकल्पाची १५०.४९ दलघमी पाणीसाठा क्षमता असून शनिवारी (दि.२४) प्रकल्प १०० टक्के भरला आहे. डोंजा भागातील निम्न खैरी नदीवरील पांढरेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे अतिरिक्त पाणी तसेच सीना नदीचे संगोबा येथून पाणी या प्रकल्पात येत आहे. रात्री उशीरा पाणीसाठा वाढल्यास दरवाजे सोडले जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सप्टेंबर भाग्याचा
मागील दोन्ही वर्षी २०२०-२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात सीना- कोळेगाव प्रकल्पासह चांदणी, खासापुरी, निम्नखैरी प्रकल्प १०० टक्के भरत आहेत. या वर्षीही सप्टेंबर महिन्यात सीना-कोळेगावसह खासापूरी, चांदणी, निम्नखैरी प्रकल्प भरल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त हाेत आहे.
खंडेश्वरवाडीचा सांडवा फाेडल्याने पाणीसाठा नाही
चांदणी प्रकल्पाची २१.५८० दलघमी, खासापुरीची १३.५९० दलघमी पाणीसाठा क्षमता असून दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. साकत मध्यम प्रकल्पाची १४.४९० दलघमी क्षमता असून लवकरच भरण्याची शक्यता आहे. खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प १०.८०० दलघमी साठवणक्षमता असून दोन वर्षापूर्वी भरावाची भिंत खचल्याने सांडव्याची भिंत फोडून पाणी सोडून दिले होते. अद्यापही भरावाची दुरुस्ती झाली नसल्याने पाणीसाठा होणार नाही, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.