आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:पारगाव येथील नऊ मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

पारगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयाच्या मल्लांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी केली. यामुळे महात्मा फुले विद्यालयाचे सात तर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे दोन, अशा नऊ मल्लांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

जिल्हा क्रीडा कार्यालय उस्मानाबाद व तालुका क्रीडा संयोजक वाशी अंतर्गत महात्मा फुले विद्यालय पारगाव व न्यू छत्रपती शाहू महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्र रुई (ता. वाशी) यांच्या संयुक्त विद्यमाने रुई येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात बुधवारी (दि. ७) तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. रुई येथील कुस्ती मार्गदर्शक व वस्ताद आनंदराव पाटील यांच्या हस्ते बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करून तालुकास्तरीय स्पर्धेला सुरूवात झाली.

या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत महात्मा फुले विद्यालय पारगाव, सत्यवती जोगदंड विद्यालय हातोला, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी, नूतन विद्यालय नांदगाव, गणेश विद्यालय तेरखेडा, सुबोध विद्यालय तेरखेडा, न्यू हायस्कूल घाटपिंपरी व जिल्हा परिषद केंद्रीय प्रा. शाळा पारगाव या शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी संयोजक म्हणून तालुका क्रीडा संयोजक अभय वाघोलीकर यांनी तर पंच म्हणून तात्यासाहेब बहीर यांनी काम पाहिले.

यावेळी महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश बडे, सिद्धेश्वर शहाणे, शिवाजी घाडगे, उमेश महाडिक, बाळासाहेब सुबुगडे, पारगाव व रूई परिसरातील कुस्ती प्रेमी, सर्व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले हे नऊ मल्ल न्यू छत्रपती शाहू महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्र रुई येथे एनआयएस कुस्ती कोच दत्ता मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. त्यांना वस्ताद आनंदराव पाटील, तात्यासाहेब बहीर, बाळासाहेब सुबुगडे, उमेश महाडिक, मोहन सुबुगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या मल्लांची निवड
या कुस्ती स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातून प्रशांत बहीर याची (७१ किलो), अमर सुबुगडे (४८ किलो), किरण आखाडे (८० किलो), अमोल रसाळ (४५ किलो) व सागर मोटे (६० किलो), तर १४ वर्षे वयोगटातून विजय सुबुगडे (४८ किलो), तेजस घाडागे (५५ किलो) यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मल्ल योगेश आखाडे (३५ किलो) व शिवतेज आखाडे (३८ किलो) यांची १४ वर्षे वयोगटातून निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...