आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक व प्रबोधनात्मक उपक्रम:बसवेश्वर गणेश मंडळाचे स्वखर्चाने उपक्रम, चांदीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बसवेश्वर गणेश मंडळाकडून २०१९ पासून चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या मंडळाची स्थापना १९९३ साली झाली. मंडळाकडून दरवर्षी सामाजिक, धार्मिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जाते. मंडळाकडून वर्गणी गोळा न करता स्वखर्चाने सर्व उपक्रम राबवले जाते, हे विशेष. त्यामुळे २०१०-११ मध्ये या मंडळास तालुकास्तरीय आदर्श गणेश मंडळाचा पुरस्कार मिळाला होता. बसवेश्वर गणेश मंडळाने कमी होणारे पर्जन्यमान आणि वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर २०१४-१५ मध्ये ‘झाडे लावा-झाडे जगवा’ उपक्रम राबवला. याअंतर्गत शहरातील दुकानदारांना झाडांची मोफत रोपटे देण्यात आली होती. वर्षभर या रोपट्यांची निगा राखून संगोपन करणाऱ्या दुकानदाराला रोख पारितोषिक देण्यात आले. २०१४-१५ मध्ये भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक न काढता जागेवरच गणेशमूर्तीचे विसर्जन केले.

तसेच टाकाऊ वस्तूपासून सामाजिक संदेश देणारे फ्लेक्स रस्ता दुभाजकामध्ये लावण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये मंडळाने वृक्षसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. यामध्ये श्रीगणेश वृक्षाला पाणी देत असल्याचे दाखवले होते. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. २०१९ मध्ये या गणेश मंडळाने चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यापुढे याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निश्चय मंडळाने केला. त्याप्रमाणे याही वर्षी चांदीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

यावर्षी या गणेश मंडळाकडून गुरुवारी (दि.१) रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ३१ जणांनी रक्तदान केले. शुक्रवारी (दि.२) ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. रविवारी (दि.४) राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, भजन सेवा, कीर्तन सेवा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष वैजिनाथ माणिकशेट्टी, उपाध्यक्ष संतोष फावडे यांच्यासह, विरेश स्वामी, रामेश्वर वैरागकर, अप्पू स्वामी, योगेश स्वामी, श्रीकांत बोराळे, महेश बादुले, नागेश जट्टे, सागर स्वामी, दयानंद स्वामी, विजय स्वामी यांच्यासह मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत. या मंडळाने विधायक कार्यातून समाजमनात स्थान निर्माण केले आहे. त्यांचे सामाजिक कार्यच अखंड सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...