आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे राज्यातले प्रमुख नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन आमदारांनी बंड केल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये दिवसभर संभ्रमावस्था होती. बंड केलेल्या या आमदारांच्या विरोधात कुठेही रोष दिसला नाही. मात्र शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता कायम होती. शिवसैनिकांनी दिवसभरातील घडामोडी विचारात घेत शांत राहून वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली. दरम्यान, आमदार डॉ. तानाजी सावंत यांचा जिल्ह्यातील शिवसेनेत प्रचंड दरारा असून, त्यांच्या विरोधात शिवसैनिकांची भूमिका अभावानेच दिसेल तर आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा-लोहारा मतदारसंघातून शिवसेनेकडून तिनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याचे समजते.
साखर कारखानदारीच्या माध्यमातून डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शिवसेनेची सूत्रे ताब्यात घेतली. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वातील कमकुवतपणा हेरलेल्या डॉ. सावंत यांनी पैसा व परखड वक्तृत्वाच्या जोरावर जिल्ह्यातील शिवसेनेवर पकड निर्माण केली. स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत कुरघोड्या, नको असलेल्या अंतर्गत प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याचा प्रयत्न, यामुळे डॉ. सावंतांना जिल्ह्यात वाव मिळाला. सुधीर पाटील, अजित पिंगळेंसारखे शिवसेनेवर मनापासून प्रेम करणारे, निष्ठावान शिवसैनिक, पदाधिकारी या काळात शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र, अंतर्गत कलहाने पोखरलेल्या शिवसेनेत काही नेत्यांनी आपले अंतर्गत प्रतिस्पर्धी संपल्याचा आनंदोत्सव साजरा केला. पुढच्या काळात मात्र डॉ. सावंत यांनी शिवसेनेत मातोश्रीवर स्वत:चे स्थान निर्माण केल्यानंतर स्थानिक नेत्यांचीच गोची झाली. शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात मग डॉ. सावंतांनी स्थानिक नेतृत्वावरच थेट बाण सोडायला सुरुवात केली.
ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक
शिवसेनेची भगवी पताका घेऊन राजकारणात, समाजकारणात आलो. पक्षाने आमदारकी, खासदारकीची संधी दिली. आपण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार म्हणून जो निर्णय घेतला आहे, तो त्यांचा निर्णय आहे.
- प्रा. रवींद्र गायकवाड, माजी खासदार.
तिसऱ्यांदा आमदार, मंत्रिपद नाही
उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र न्याय मिळाला नाही. त्यांचे एकनाथ शिंदेंशी १० वर्षांपासून घनिष्ठ संबंध आहेत. लोकसभेची उमेदवारी डावलल्याने शिवसेनेवर अाधीच नाराज माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाडांचे चौगुलेंना पाठबळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंडामुळे चौगुलेंना फारसा विरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. मात्र, येणाऱ्या काळात घडणाऱ्या घडामोडीनंतरच शिवसैनिकांची खरी भूमिका समजू शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.