आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या सहाव्या माळेला बुधवारी तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार पुजा मांडण्यात आली. दिवसभरात शेकडो भाविकांनी तुळजाभवानी मातेचा भवानी तलवार अलंकार रूपाचे दर्शन घेतले. रात्री, उशिरा संबळाच्या कडकडाटात छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळच्या मानाची सिंहासन पुजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारती करण्यात आली. नंतर सहाव्या माळेनिमित्त तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार पुजा मांडण्यात आली.
यावेळी महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, यजमान श्रीराम कुलकर्णी यांनी सपत्नीक व सह सेवेकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळच्या अभिषेक पूजेपर्यंत हजारो भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या भवानी तलवार अलंकार रूपाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी पहाटे चरणतीर्थ पुजा होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. तर सकाळी ६ वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला.
अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारती करण्यात आली. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री १० च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला. तुळजाभवानी मातेची चांदीची मुर्ती छबिना वाहनात ठेवून संबळाच्या कडकडाट प्रदक्षिणा मार्गावर एक प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी यजमान कुलकर्णी यांच्या सह पुजारी, सेवेकरी, भाविक, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भवानी तलवार; अलंकार पूजा
छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी मातेने धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून आशिर्वाद दिल्याची आख्यायिका सांगितली जात असून या निमित्त नवरात्रात भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी मातेवर अपार श्रद्धा होती तसेच जगदंब जगदंब असा तुळजाभवानी मातेचा सदैव जप करत असत. दोन्ही नवरात्रात तसेच शिवजयंती दिनी अशी वर्षभरात तीन वेळा भवानी तलवार अलंकार पुजा मांडण्यात येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.