आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलमपट्टीवर भागवण्याचे काम सुरू:सांज्यानंतर शिंगोलीच्या ब्रिजलाही तडे; दर्जाकडे दुर्लक्षाने धोक्याची शक्यता

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोली गावाजवळील ब्रिजला तडे गेले आहेत. त्यामुळे आयआरबी कंपनीकडून प्लास्टर करून काम भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही सांजा चौकातील ब्रिजला तडे गेल्याचा प्रकार झाला होता. आयआरबीने मलमपट्टी करण्याऐवजी ब्रिजचे काम दर्जेदार करण्याची मागणी वाहनधारकांतून हाेत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावरून धुळे ते सोलापूर, हैदराबादपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या महामार्गावरून सर्वाधिक वाहतूक अवजड वाहनांची आहे. मात्र, आयआरबी कंपनीने अवजड वाहनांच्या वाहतुकीचा विचार करून रस्त्यावरील ब्रिजचे काम केल्याचे दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील ब्रिजला तडे जाणाचे प्रकार उघडकीस येत आहेत.

अवजड वाहनांमुळे प्लास्टरची दुरुस्ती जास्त दिवस टिकणार नाही. अचानक लोड येवून ब्रिजचा कॉलम निखळल्यास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ब्रिजवरून धुळे-सोलापूर सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून ब्रिजखालून उपळा, तेर यासह इतर पाच ते सात गावांतील लोकांची वाहतूक होते. दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आयआरबीने ब्रिजच्या कॉलम पूर्ण बदलून महामार्ग दर्जेदार करण्याची गरज आहे. कंपनीकडून वाहनधारकांकडून टोल वसूल करण्यात येत आहे. परंतु दर्जेदार सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

खालच्या बाजूने दोन ठिकाणी भेगा, पावसाळ्यात पाझरत होते पाणी
उस्मानाबाद शहरालगत शिंगोली गावाजवळील ब्रिजला तडे गेले असून खालच्या बाजुने दोन ठिकाणी भेगा पडल्या. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी ब्रिजच्या मुख्य कॉलममधून पाझरत होते. पाऊस बंद झाल्यानंतर आता पाझर कमी झाला आहे. यामुळे आयआरबी कंपनीकडून उड्डाणपुलावरील भेगा बुजण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी ब्रिजच्या खाली परांच्या बांधल्या आहेत. ब्रिजच्या कॉलमची दुरुस्ती होत असली तरी हा प्रकार धोकादायक आहे.

आयआरबीकडून काम, वर्षभरात भेगा, दर्जेदार कामाची मागणी
उस्मानाबादेत बाह्यवळण रस्त्यावरील सांजा चौकातील ब्रिजलाही तडे गेले होते. आयआरबीने काही दिवस वाहतूक बंद करून काम केले होते. धुळे-सोलापूर महामार्गाचे काम होऊन काही वर्ष झाले होताच ब्रिजला भेगा पडत आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आयआरबीने महामार्गावरील सर्व ब्रिजचे काम दर्जेदार करून वाहनधारकांची सोय करावी. वाहनधारकांकडून दर ५० किलोमीटरला टोल आकारला जातो. त्या तुलनेत सेवा देण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...