आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणी सोमवारी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन:जटाशंकर आणि रोहकलेश्वर मंदिरात श्रावणात गर्दी; मुळजचे देवस्थान, चार राज्यांचे भक्ती पीठ

अंबादास जाधव। उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह चार राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेले दैवत तालुक्यातील मुळज ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री जटाशंकर मंदिरात श्रावण मासात प्रत्येक सोमवारी भाविक-भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या तीर्थक्षेत्राला नुकताच ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

ग्रामदैवत श्री जटाशंकर मंदिरात प्रत्येक सोमवार,अमावस्या महाशिवरात्री, यात्रा महोत्सवात मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला असतो. शहरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर मुळज गावच्या पूर्वे दिशेला एक किलोमिटर अंतरावर विशाल वटवृक्षाच्या छायेत श्री. जटाशंकराचे हेमाडपंती मंदिर असून मंदिराचा गाभारा सहा दगडी खांबावर सुंदर पुरातन काळातील कलाकुसर करून उभारण्यात आला आहे. मंदिरात गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मीची कोरीव आकर्षक मुर्ती तर चौकटीवर रेखीव कलाकुसरीची विविध नक्षीकाम केलेली दिसून येत आहे. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून शिवलिंगाच्या मागील बाजूला एका अखंड दगडी शिळेवर श्री महादेवाचे वाहन नंदीवर स्वार असलेली शिवपार्वतीसह गणपतीची मुर्ती आहे.

पश्चिमेला छोट्या मंदिरात शिवलिंग, वायव्य दिशेला चर्मकार समाजातील भक्तांची समाधी, दक्षिणेला छोटा तलाव सद्यस्थितीत तो नामशेष झालेल्या अवस्थेत व विविध ऋषीमुनी, महंतांची समाधीस्थळे विसावली आहेत.मंदिराच्या समोर वीस फुट उंचीच्या दगडी दीपमाला आणि निसर्गरम्य वातावराणामुळे येथे येणाऱ्या भाविकांचे चित्त प्रसन्न होते. या मंदिरा बाबतची आख्यायिका असून ज्येेष्ठ मंडळी सांगतात की, वनवासात राम सीतेच्या शोधात असताना येथून पुढे कर्नाटकातील अमृतकुंड येथे गेले. जटाशंकर देवस्थानची प्राचीन काळापासून प्रतिवर्षी गुढीपाडव्याला देवाच्या काठीचे मानकरी सोयराप्पा घराणे यांच्यावतीने काठी प्रतिष्ठापनेने पंधरा दिवस यात्रा चालते. लाखो भाविकांची गर्दी यात्रा काळात असते.

बातम्या आणखी आहेत...