आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमुद्राला आलेली भरती आणि उलट्या दिशेने वाहणारे वारे, अशा परिस्थितीत तिने अवघ्या ७ तास १० मिनिटांत समुद्री जलतरण स्पर्धेत सुमारे ३० किलोमीटर अंतर कापत यशाचा किनारा गाठला. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेतही तिने दैदिप्यमान यश मिळवत कमाल करून दाखवली होती. अवघ्या १५ वर्षाच्या श्रावणी पांडूरंग रणखांब हिच्या या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. समुद्री स्पर्धेत अलगद पोहणारी श्रावणी आता उस्मानाबादची जलपरी म्हणून नावारूपाला येत आहे.
ज्या शहरात जलतरण तलाव नाही, अशा उस्मानाबाद शहरात वाढलेली श्रावणी वडिलांसाेबत दररोज तलावात जाऊन सराव करत आहे. कोल्हापूरच्या जिम-स्विम अकॅडमीने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील समुद्री खाडीमध्ये ३० किलाेमीटर जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. मालपी ते विजयदुर्ग, अशा ३० किलोमीटरच्या स्पर्धेचे अंतर कापण्यासाठी साडेसात तासांची वेळ निर्धारित करण्यात आली होती. यावेळी समुद्रात उलट्या दिशेने वारे वाहत होते तर समुद्राला भरती आली होती. त्यामुळे पोहताना दमछाक सुरू होती.
तरीही श्रावणी रणखांब हिने अवघ्या सात तास, दहा मिनिटंत हे अंतर कापले आणि यश मिळविले. तिचा या स्पर्धेत चौथा क्रमांक आला. तिच्या यशाबद्दल जिम-स्विम अकॅडमीचे अजय पाठक, राजेंद्र पालकर यांच्यासह स्थानिक सरपंचांसह विविध मान्यवरांनी श्रावणीला ट्रॉफी देऊन सन्मानित केले. श्रावणीने गेल्या वर्षीच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला होता. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल उस्मानाबादकरांनीही तिचे भरभरून कौतुक केले आहे.
भारतातली सर्वात मोठी स्पर्धा
विजयदुर्ग येेथे श्री दुर्गामाता कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ संचालित जिम-स्विम अकॅडमीच्या वतीने समुद्री जलतरण स्पर्धा आयोजित केली जाते. ३० किलोमीटर अंतराची सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करणारी ही पहिली अकॅडमी असून, या स्पर्धेत भाग घेणारी श्रावणी उस्मानाबादची पहिली कन्या आहे. तिने यापूर्वी मंुबई तसेच विजयदुर्गला झालेल्या दोन किलोमीटरच्या स्पर्धेतही भाग घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.