आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:सीना-कोळेगाव प्रकल्पातून यंदा दोनदा होणार शेतीला पाणीपुरवठा; एक आवर्तन पूर्ण, आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोडणार पाणी

परंडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सीना- कोळेगाव प्रकल्पातून यावर्षी उन्हाळ्यात शेतीला दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये एक आवर्तन पूर्ण झाले असून, आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात येणार आहे. सीना-कोळेगाव प्रकल्पात सध्या ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यात यंदा १९ एप्रिल रोजी ३.९५ दलघमी पाणी सोडण्यात आले. तसेच कंडारी कालव्याद्वारेही पाणी सोडले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सन २०२०-२१ मध्ये पाणी सोडण्यात आले होते. तालुक्यातील सीना-कोळेगावसह खासापुरी, चांदणी, साकत, खंडेश्वरवाडी व पांढरेवाडी मध्यम प्रकल्प सलग दोन वर्षे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु सध्या पाण्याचा उपसा व बाष्पीभवनामुळे जलसाठा कमी होत आहे. तालुक्यात सर्वाधिक मध्यम प्रकल्प आहेत. २००७ मध्ये जिल्ह्यात सर्वात मोठा ५.३० टीएमसी क्षमतेचा सीना कोळेगाव प्रकल्प उभारण्यात आला. त्यामुळे परंडा तालुक्यातील ६८०० हेक्टर व करमाळा तालुक्यातील ३४०० हेक्टर तर अनाळा उपसासिंचन योजनेद्वारे १९०० हेक्टर क्षेत्र असे एकूण १२१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु त्यासाठी कालव्याची दुरुस्तीची कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. सीना-कोळेगाव प्रकल्प आतापर्यंत सन २०११ व २०१६-१७ तसेच २०-२१ या वर्षात पाच वेळेस पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच खासापुरी, साकत, चांदणी, खंडेश्वरवाडी, पांढरेवाडी मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला होता. विहीरी व बोअरमधील जलपातळी वाढल्याने सिंचन क्षेत्रात झपाटयाने वाढ झाली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली. उसाचे क्षेत्र लक्षात घेऊन आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी सन २००८ मध्ये भैरवनाथ शुगर युनिट उभारल्याने तालुक्याचा गेटकेनचा शिक्का पुसला गेला. गतवर्षी १७ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली होती. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्यात आला आहे. भैरवनाथ, बाणगंगा, इंद्रेश्वर साखर कारखान्यामुळे तालुक्यातील बाजापेठेतील आर्थिक उलाढलीत वाढ झाली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के भरला सीना-कोळेगाव प्रकल्प:
तालुक्यात सरासरी ६१५ मिमी पावसाची आवश्यकता असते. अवकाळी पावसाने सीना-कोळेगाव प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरातील क्षेत्रात ऊस लागवड झाली. त्यामुळे खरीप व रब्बी क्षेत्रात घट झाली आहे. तालुक्याची रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळख होती. यावर्षी पावसामुळे ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. तर उडीद, तूर, कांदा व कापूस आदी नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत झाली आहे. यावर्षी बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. परंतु दर १००० ते १२०० पर्यंत आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

भोत्रा बंधारा व कंडारी कालव्यातून सोडले पाणी
तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यात सन २०२०-२१ मध्ये तसेच यावर्षी १९ एप्रिल रोजी ३.९५ दलघमी पाणी सोडण्यात आले. तसेच कंडारी कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळला आहे. नगरपरिषदने पिण्यासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत १.२६ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. तसेच खासापूरी प्रकल्पातील २.२६ दलघमी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...