आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या उमरगा तालुक्यात कर्नाटक, गोवा ब्रँडच्या अवैध बनावट दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक व विक्री होत असल्याचे समजते. यामध्ये देशी-विदेशी, हातभट्टी, ताडी आदी बनावट दारुचाही समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या संगनमताने हे होत असल्याची चर्चा आहे.
उमरगा शहरासह तालुक्यात शंभराहून अधिक बिअर बार व परमिट रुम आहेत. बार, देशी दारू दुकान व बिअर शॉपीच्या नावाखाली सर्रास नियमांचे उल्लंघन होत आहे. बहुतांश बारमध्ये शौचालय व प्रसाधनगृह नसतानाही चढ्या दराने दारूविक्री केली जात आहे. संबंधित बिअर बार मालकावर कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्यांचा वचक दिसत नाही. फक्त महिन्याला चौकशीच्या नावाखाली येऊन ‘अर्थ पूर्ण’ कार्यवाही होत असल्याची चर्चा आहे. शहरासह तालुक्यात हॉटेलच्या नावाने गोवा, कर्नाटकातील देशी, विदेशी, हातभट्टी विकली जात आहे. या बनावट दारूची विक्री बार, हॉटेल व ढाब्यांवर केली जाते, असे अनेक ग्राहक खासगीत बोलतात. एकीकडे सगळ्या गोष्टींवर पांघरूण घालण्यासाठी महिन्यातून दोनदा उमरगा परिसरातील छोट्या हातभट्टी, गावठी, ताडी उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही दाखवून कर्तव्य पूर्ण केल्याचा आव आणला जातो.
शहरासह ग्रामीण भागातील अनेक बार चालकांना वेळेचे बंधन नाही, अनेक ढाब्यांवर व हॉटेलमध्ये सर्रासपणे दारूविक्री होते. दारू पिण्याचा परवाना नसतानाही सर्रासपणे ग्राहकाला दारू विक्री केली जात असल्याचे समजते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांना सहज दारू उपलब्ध होत असल्याने युवापिढी व्यसनाधीन होत आहे.
विरोध असतानाही परवानगी
जकेकूर हद्दीत नवीन बार परवान्याला नागरिकांचा विरोध असतानाही संबंधित विभागाकडून परवानगी देण्यात आली. यासंबंधी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही नवीन बारला परवानगी दिली. याला राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बिअर बार मालकावर वचक नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढले आहे.
ढाब्यासमोर मालाची क्रॉसिंग
उमरगा तालुक्याला लागून असलेल्या शेजारील कर्नाटकातील आळंद मार्गे उमरग्यात चोरीची वाहतूक पिकअप व प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांमधून राजरोसपणे होत आहे. लातूर-गुलबर्गा महामार्गावर एका ढाब्यासमोर मालाची क्रॉसिंग देखील केल्याची प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.