आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:शेतीचे उत्पन्न घटूनही पाच महिन्यांत फक्त ५१८ नमुन्यांची मृदा तपासणी;  रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब, पोषक घटकांची कमी

उपेंद्र कटके | उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीचा पोत बिघडून उत्पादनात घट होण्याचे प्रमाण वाढत आहे. योग्य प्रमाणात खते वापरुन भरघोस उत्पादनासाठी माती परीक्षणाची गरज असताना याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या पाच महिन्यात केवळ ५१८ जणांनीच शेत जमिनीचे माती परीक्षण केले आहे. जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही कमी पडत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा भरमसाठ वापर शेतीसाठी केला जात आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडून उत्पादनात घट होत आहे. पिकांच्या उत्पादनात घट होण्यासाठी पावसाचे प्रमाण, कीडींचा प्रादुर्भाव, प्रकाश संश्लेषण आदी घटक कारणीभूत असले तरी यामध्ये जमिनीतील पोषक घटकांची कमी असणेही कारणीभूत ठरत आहे. आपल्या जमिनीत नेमकी कोणत्या घटकांची किंवा मुलद्रव्यांची कमतरता आहे, याचा शोध घेण्यासाठी माती परीक्षणाची मोठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी कार्यालयात सक्षम प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहे.

जमिनीला कोणत्या घटकांची गरज आहे, यासाठी माती परीक्षण करून प्रयोगशाळेत जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येत असते. मात्र, अशी आरोग्य पत्रिका तयार करून घेण्यासाठी शेतकरी उदासीनच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात केवळ ५१८ जणांनीच माती परीक्षण करून घेतलेले आहे. यामध्ये एप्रिलमध्ये ७७, मे मध्ये ९८, जूनमध्ये १४८, जुलैमध्ये १०५ तर ऑगस्टमध्ये ९० शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका तयार केली आहे. गतवर्षीही याच प्रमाणात शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले होते. जिल्ह्यात सुमारे चार लाख ५० हजार शेतकरी असतानाही मृदा परीक्षणाचे प्रमाण नगण्य आहे.

केवळ योजनांकरता माती परीक्षण
केवळ योजनांच्या माध्यमातूनच आहे त्या शेतकऱ्यांची माती परीक्षण केलेले आहे. यामध्ये फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने माती परीक्षण अनिवार्य केले आहे. यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले आहे त्यातील बहुतांश जणांचा शासकीय लाभ घेण्याचाच उद्देश आहे. आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला नाही.

परीक्षणात स्फुरद, झिंक, फेरसचे प्रमाण कमी
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या काही माती परीक्षणांमध्ये स्फूरदचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. या खालोखात सूक्ष्म मुलद्रव्यांमध्ये झिंक व फेरसचे प्रमाण कमी आहे. असे प्रमाण असतानाही नत्र व पालाश मिश्रित खतांचा भरमसाठ उपयोग केला जातो. परंतु, स्फूरदचे प्रमाण वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून काहीही प्रयत्न होत नाहीत. असाच प्रकार झिंक व फेरस या सूक्ष्म मुलद्रव्यांच्या बाबतीत आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर योग्य घटक न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटणार आहे.

प्रशासनाकडून आरोग्य पत्रिकेबाबत हवी जागृती
माती परीक्षणासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अद्यापही जागृती नाही. यामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात विशिष्ठ खतांची मागणी केली जाते. परिणामी काळा बाजार होऊन खतांची विक्री होत असते. याचा ताण प्रशासनावरही येतो. माती परीक्षणातून आवश्यक खते कळाल्यानंतर एकाच प्रकारच्या खतांची मागणी कमी होईल. यामुळे प्रशासनाचा ताणही कमी होऊन शेतकऱ्यांनाही फायदा होईल. यामुळे प्रशासनाने माती परीक्षणासाठी सक्षमपणे जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

मृदा परीक्षण वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू, जागृतीही करणार
प्रशासनाकडून विविध प्रकारे माती परीक्षणाचे प्रमाण वाढ‌वण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे शेतकरी माती परीक्षणासाठी नमुने सादर करण्याची संख्या वाढत आहे. यापुढेही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
दीपक दहीफळे, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...