आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बी हंगाम:उमरगा तालुक्यात सात हजार 124 हेक्टरवर पेरणी; हरभऱ्यास प्राधान्य

उमरगा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतात पाणी साचल्याने मशागतीसह पेरणीला अडचण येत असून रब्बी हंगामाच्या पेरणीला उशीर होत आहे. यामुळे सर्वाधिक क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता आहे. काही भागातील शेत वाफशात आल्याने शनिवारपर्यंत (दि.५) उमरगा तालुक्यात एकूण ४४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे.

उमरगा तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगामात काढणी आणि राशीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतीबरोबरच पिकेही पाण्यात अडकली हाेती. शासनाने दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जिरायती व बागायत शेतीला हेक्टरी १३ हजार ६०० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, ही रक्कम एकूण नुकसानीच्या २५ टक्केच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनुदान व विमा कंपनीच्या रकमेवरून सत्ताधारी आणि विरोधकांसोबतच बजाज विमा कंपनीची राजकीय धुळवड झाली आणि २०२० प्रलंबित विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

पीक पाहणी प्रयोग पंचनाम्यात केवळ सोयाबीनचे बाधित क्षेत्रच गृहित धरण्यात आले. दोन एकर क्षेत्रात सोयाबीन कमी-अधिक प्रमाणात बाधित झाले होते. मात्र, जेथे पाणी तेथीलच क्षेत्र बाधित धरल्यामुळे मिळणाऱ्या अनुदानाची रक्कमही तुटपुंजी आहे. तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामाचे ४४ हजार ६०० हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. शनिवारपर्यंत ७ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. दरम्यान, मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास सहा हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याची मागणी
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले आहे. शेतातील पाणी कमी झाल्यानंतर राहिलेले पीक काढले आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने हरभरा पीक घ्यावे लागत आहे. शेत तयार करून पेरणी करण्यास एकरी १२ ते १४ हजार रुपये खर्च येत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना हरभरा अनुदानित बियाणे ड्राॅ पद्धतीने वाटप करण्यात येत आहे. ऑनलाइन नोंदणी केलेली बियाणे न मिळता अन्य वाणांचे बियाणे देण्यात येत असल्याने काही शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे घेतले नाही. तालुक्यात सर्व शेतकऱ्यांना हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप करण्याची मागणी होत आहे.

पीकनिहाय क्षेत्र, कंसात पेरणी झालेले व टक्केवारी
उमरगा तालुक्यात ज्वारीचे एकुण १६ हजार ७ हेक्टर (६६४), गहू पेरणीचे क्षेत्र २ हजार ४७५ हेक्टर (३२०), हरभऱ्याची एकुण २० हजार ८४५ हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार ५६० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. करडईचे पेरणी क्षेत्र ३ हजार १४ हेक्टर (५८०) आहे. जवस ४१४ हेक्टर क्षेत्रावर तर सूर्यफुलाचे एकूण एक हजार ४७० हेक्टर पेरणी (रब्बी) क्षेत्र आहे.

बातम्या आणखी आहेत...