आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:एक लाख हेक्टरवरील सोयाबीनला तांबेराचा फटका, उत्पन्नात येणार तूट; कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजातून नुकसान स्पष्ट

बाळासाहेब माने | उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततचे ढगाळ वातावरण अन् रिमझिम पावसामुळे सोयाबीनवर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यातील चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार एक लाख हेक्टरवरील सोयाबीनला फटका बसल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वच क्षेत्रातील पिकांवर तांबेराचा प्रादुर्भाव झाला. यामुळे उत्पन्नात तूट होत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. ऐन शेंगा लागणे व भरण्याच्या मोसमात पानगळतीमुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या फवारणीला अडचण येत आहे. जिल्ह्यात जवळपास ५ लाख हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी संरक्षित होते. त्यापैकी ४ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. पेरणी दरम्यान पावसाच्या असमतोलतेमुळे दोन टप्प्यात पेरणी झाली आहे. यामध्ये जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची पेरणी झाली आहे. यामुळे सध्या अर्ध्या भागातील सोयाबीन काही दिवसांत काढणीला येईल तर काही भागातील सोयाबीन शेंगा भरणीच्या मोसमात आहे. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणाने व रिमझिम पावसामुळे सुरूवातीला गोगलगाय, येलो मोझॅक अन् सप्टेंबर तांबेराचा प्रादुर्भाव झाला आहे.

यामुळे सोयाबीनचे पान एका रात्रीत पिवळे होऊन काही दिवसांत पानगळती होत आहे. तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करण्यास अडचण येत आहे. भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा खतासह कीटकनाशकांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक काळ ढगाळ अन् रिमझिम पावसाचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांना दोन ऐवजी चार तर काही शेतकऱ्यांना तीन ऐवजी चार फवारण्या कराव्या लागल्या आहेत. सोयाबीनवर मोठा खर्च करूनही शेवटी येलो मोझॅक व तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याने एकरी उत्पन्नात तूट निर्माण होणार आहे.

परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. उशिरा पेरणी झालेल्या काही भागातील सोयाबीनला अद्याप अपेक्षित शेंगा लागल्या नाहीत, मात्र तांबेरा पडल्याने पीक पिवळे पडले आहे. यामुळे सोयाबीनच्या काडीला अत्यल्प शेंगा दिसत आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

उशिरा पेर झालेल्या सोयाबीनला फटका
यंदा जिल्ह्यात ४० टक्के पेरणी २० जूनपर्यंत झाली होती. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीत खंड पडला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाने उर्वरित ६० टक्के पेरणी मागास आहे. मागास पेरणीतील शेंगा भरण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, तांबेराने पीक वाया जात आहे. आगात पेरणीच्या सोयाबीनला थोड्या शेंगा आहेत.

प्राथमिक अंदाज, तांबेराने २५ % नुकसान
सोयाबीनवर तांबेराचा प्रादुर्भाव झाला. पीक पाहणीसाठी दौऱ्यावर आहे. प्राथमिक अंदाजानुसार तांबेराने २५ टक्के क्षेत्रावरील सोयाबीनला फटका बसला. याबाबत पाहणीचे काम सुरू असून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल. -महेश तीर्थकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

तांबेराने नुकसान, पंचनामे करून मदत द्या
सुरूवातीला गोगलगाय त्यानंतर मोझॅको व तांबेराने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.-शरद चव्हाण, शेतकरी, पखरूड, ता. भूम.

बातम्या आणखी आहेत...