आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्रीकृष्ण मंडळाची सातत्यपूर्ण उपक्रमांची परंपरा ; यावर्षी सायबर क्राइमबद्दल जनजागृतीपर देखावा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित उत्सव न करता वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजात जनजागृती घडवून आणतानाच सामाजिक कार्याची परंपरा अखंड जपणारे गवळी वाडा भागातील श्रीकृष्ण गणेश मंडळ खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र ठरले आहे. दरवर्षी समाजजागृतीपर नवनवीन देखावा साकारून, मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या तालावर शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या मंडळाने १९९२ पासून आजवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. यावर्षी मंडळाने सायबर क्राइमविषयी देखावा तयार केला आहे.

गवळी वाडा भागातील श्रीकृष्ण मंडळाची स्थापना १९९२ मध्ये झाली. तेंव्हा हा परिसर ग्रामीण भागात गणला जात होता. हद्दवाढ नसल्याने या भागात अपेक्षित सुविधाही नव्हत्या. लोकवस्तीही कमीच होती. गवळी समाजातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या गणेश मंडळाने पहिल्या वर्षापासूनच आपले वेगळेपण जपले. त्यामुळे जुन्या शहरापासून काही अंतर दूर असले तरी या गणेश मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी उस्मानाबादकर गवळी वाड्याकडे येत होते. हळुहळू लोकवस्ती वाढत गेली आणि मंडळाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. मंडळाने १९९३ मध्ये हुंडाबळीचा देखावा साकारला. ३० वर्षापूर्वी समाजात विवाहातील हुंड्याचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे होणारे कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यामुळे तुटणारी नाती,यासंबंधी देखाव्यांतून जनजागृती करण्यात आली होती. पुढे दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारत मंडळाने आपले वेगळेपण कायम ठेवले. एकाच देखाव्यांची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही दक्षता घेतली. त्यामुळे दरवर्षी वेगळा देखावा पहायला मिळणारच,याची गणेश भक्तांना खात्रीच असते.

स्त्रीमुक्ती देखावा,सर्वधर्मसमभाव पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, एड्स मुक्ती, पर्यावरण, कारगिल युध्द, अंधश्रध्दा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, बालविवाह प्रतिबंध, रावणाचे गर्वहरण, पाणंदमुक्त योजना, भ्रष्टाचारमुक्त भारत, पृथ्वीची विनाशाकडे वाटचाल, देहदान, पाणी आडवा, पाणी जिरवा, बेटी बचाव, एक झाड, एक जीवन,आदी देखाव्यांतून समाजात जनजागृती घडवून आणली. विशेष म्हणजे या वेगवेगळ्या देखाव्यांना उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा पोलिस दलासह शिवसेना, आरोग्य विभाग, रोटरी क्लब,इनर व्हिल क्लब,महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार मिळाले आहेत. त्यात वृक्षारोपणासह रक्तदान, महिलांचे आरोग्य शिबिर आदी उपक्रमांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...