आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षात दोनदा घटना:डिझेलअभावी एसटी बससेवा विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप; तासभर ताटकळले

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामंडळाच्या सहा बसेसला दुपारी दोन खासगी पंपावर जाऊनही डिझेल मिळाले नाही. यामुळे बसमधील प्रवासी तासभर ताटकळल्याची घटना गुरुवारी घडली. सहा किमी लांब गेलेल्या बस अर्धा तास पेट्रोल पंपावर थांबल्या. डिझेल न मिळाल्याने पुन्हा शहरात येत डिझेल भरुन मार्गस्थ व्हावे लागले. महामंडळाला पूर्वी थेट कंपनीकडून डिझेल मिळत होते. मात्र, कंपनीचा दर वाढल्याने महामंडळाने खासगी वितरकांकडून डिझेल घेण्याचे नियोजन केले. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर पंपचालक, महामंडळाचे अधिकाऱ्यांच्या विविध बैठका होऊन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार खासगी पंपावर डिझेल भरण्यास प्रारंभ झाला.

मात्र, महामंडळाकडून ठरल्यानुसार वेळेवर पेमेंट करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील भूमसह अन्य आगारातील बसेसला डिझेल मिळाले नसल्याने महामंडळासह प्रवाशांचीही गैरसोय झाली होती. बसेस जागेवरच थांबून होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार घडला होता. त्याची झळ सर्वच आगारातील बसेसला बसला नव्हता.

मात्र, प्रवाशांची तारांबळ उडाचली होती. अधिकाऱ्यांकडून तोडगा न काढता वेळ मारुन नेल्याने पुन्हा तसा प्रसंग उद्भवत असल्याचे समजते. एकीकडे गाड्या नसल्याने तर दुसरीकडे गाडी उपलब्ध असूनही वेळेवर डिझेल मिळत नसल्याने प्रवाशांसह वाहनचालक, वाहकांचीही गैरसोय होत आहे. दरम्यान, यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे प्रभारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

चालकांना बस मिळेना
सध्या आगारात बस कमी व कर्मचारी अधिक आहे. त्यामुळे अगोदर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बस मिळते. इतरांना आगारात सायंकाळपर्यंत बसावे लागते. दुपारी आलेल्यांना उशिरापर्यंत थांबून गाडी उपलब्ध नसल्याने रजा टाकून आल्या पावली माघारी जावे लागण्याची वेळ आली आहे. यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत.

टँकर येण्यास विलंबाने पंपावरही डिझेलची अडचण
उस्मानाबाद आगारातील एसटी बस बीएसएनएल ऑफिस समोरील पंपावर डिझेल भरुन घेत असतात. मात्र, गुरुवारी (दि.१) तेथे डिझेल उपलब्ध नव्हते. दुपारनंतर डिझेलचे टँकर येणार होते. त्यामुळे सहा बसेस पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने तुळजापूर रोडवरील वडगाव जवळील पंपावर डिझेल भरण्यासाठी पोहचल्या. मात्र, तेथेही कमी डिझेल होते. तेथेही टँकर येण्यास विलंब होता. त्यामुळे तेथेच या बसेस अर्धा तास थांबून होत्या. दरम्यानच्या, काळात बसेस व पंपावरील कर्मचारी यांच्यात काही वेळ शाब्दिक फैरी उडाल्या होत्या. मात्र, शहरातील पंपावर डिझेल उपलब्ध झाल्यावर या बसेस तेथून पुन्हा परत शहरात आल्या व डिझेल भरुन मार्गस्थ झाल्या.

काम द्या, अथवा सुटी तरी द्या
बसेस कमी असल्याने सर्वांना कामावर हजर राहणे शक्य होत नाही. अनेक कर्मचारी आगारात येऊन दिवसभर बसून गाडीच्या प्रतीक्षेत असतात. गाडीच नसल्याने शेवटी रजा टाकून माघारी फिरतात. त्यामुळे आम्हाला काम द्या अथवा कामाच्या वेळेवरच सुटी द्या, असे आर्जव कर्मचारी करत आहेत. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे कारवाई होण्याच्या भितीने कर्मचारी याबाबत दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.

गाड्यांची संख्या कमी
उस्मानाबाद आगारात पूर्वी १०५ एसटी गाड्या होत्या. त्यांची संख्या आता ८४ पर्यंत खाली आली आहे. त्यापैकी १२ बसेस या दुरुस्तीसाठी एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत आहेत. तर या आगारातील नियमित दोन ते चार बसेस दुरुस्तीसाठी असतात. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर ७० बसेस धावत आहेत, अशीच स्थिती इतर आगारातही आहे.

बातम्या आणखी आहेत...