आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील आठ दिवसापासून उमरगा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पावसाचा बहुतांश भागात शेती पिकांना मोठा फटका बसत असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसणार आहे.उमरगा तालुक्यात जुलै व त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे १२ दिवसांपेक्षा अधिक काळ सूर्यदर्शन झाले नाही. त्यानंतर तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे शेतकरी औषध फवारणी व कोळपणी कामात व्यस्त होते. मात्र, पुन्हा पावसाने भाग बदलून जोरदार बरसात केली आहे. यामुळे सोयाबीन, तूर, उडीद आदींसह पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच किडरोगासोबतच गोगलगायीला प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून आठ दिवसांपासून उमरगा शहर परिसरासह बेडगा, समुद्राळ, डिग्गी, तुगाव, माडज, कडदोरा, कलदेव निंबाळा आदी भागात अर्धा ते एक तास जोरदार पाऊस झाला.
यामुळे सोयाबीनसह इतर पिके, ऊसाचे फड, भाजीपाला व फळबागा पाण्यात असल्याने सोयाबीन पिवळे पडत आहे. काही भागात पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी पावसात व कमी दिवसात येणारे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पीक कमी पाण्यात ९० ते १०० दिवसांत येते. यावर्षी पेरणीनंतर चांगले उगवले असतानाही आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कोवळी पीक सडण्याच्या व कुजण्याच्या मार्गावर आहेत. पुढील काही दिवसांत मुसळधार व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
खरीप हंगाम संकटात
उमरगा तालुक्यात जून महिन्यात सरासरी १०८ मिमी पाऊस झाला. जुलैमध्ये सर्वाधिक ३४१ मिमी पाऊस झाला. चार दिवसांपासून पावसामुळे शेतकरी संकटात सापडले. ऑगस्टच्या चार दिवसांत उमरगा मंडळ विभागात ७३.३०, दाळिंब २९.३०, नारंगवाडी ३८.५०, मुळज ३९.१०, मुरुम मंडळ विभागात ३५.४० मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ४८८ मिमी पाऊस झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.