आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मंडळाधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन ; सर्व्हेचा उल्लेख नसल्याने कार्यवाही करण्यात अडचणी

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नारंगवाडी विभागाचे मंडळ अधिकारी पी. जी. कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघाच्या वतीने शुक्रवारी (दि.१०) तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ९ जून रोजी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार (पुरवठा) हे मातोळा येथील शेतरस्ता प्रकरणात स्थळपाहणी पंचनामा करण्यास गेले होते. यावेळी सतीश त्र्यंबक भोसले (रा. मातोळा) यांनी मंडळ अधिकारी पी. जी. कोकणे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हा दाखल झाला. अतिक्रमीत शेतरस्ते खुले करताना जिल्ह्यात वारंवार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. त्यामुळे प्रकरणातील आरोपींनी अटक करुन कारवाई करावी. शेतरस्ता स्थळपाहणी व खुला करतेवेळी सोबत पोलिस कर्मचारी, भूमिअभिलेख विभागाचा एक कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत लेखी आदेश निर्गमित करावेत. शेतरस्ता प्रकरणी तहसील कार्यालयाचे मोघम पत्र प्राप्त होत आहे. यात कोणत्या कलमानुसार शेतरस्त्याची मागणी केली, याचा उल्लेख नसतो. गैरअर्जदारांच्या नावाचा व सर्व्हेचा उल्लेख नसल्याने कार्यवाही करण्यात अडचणी येतात. यानंतर अशा मोघम अर्जानुसार आलेले पत्र यापुढे कारवाई न करता उलट टपाली परत केल्या जाणार. तहसील कार्यालय शेतरस्ता स्थळपाहणी व व खुला करताना वरिष्ठ तोंडी आदेश देत असून या प्रकरणात अनेकदा कायद्याची गुंतागुंत निर्माण होते. लेखी आदेश नसल्याने अडचणी येतात. वरिष्ठ कार्यालयातून शेतरस्ता खुला करण्याचे आदेश निर्गमित झाल्यावर या प्रकरणात अपिलाचा कालावधी संपण्यापूर्वीच सदर रस्ता खुला करण्यास सांगितले जाते. त्यामुळे विरोधी पक्षाचा गैरसमज होऊन कायदेशीर पंच निर्माण होतात. पोलीस विभागाशी व कृषी विभागाशी संबंधीत तर महावितरणशी संबंधीत अर्ज मंडळ किंवा तलाठी कार्यालयाकडे न पाठवता संबंधीत विभागास कारवाई करण्यासाठी पाठवावेत. दरम्यान नमूद प्रकरणात गुन्हेगारांना अटक झाली नाही तर सोमवारपासून (दि.१३) तलाठी, मंडळ अधिकारी संघटनेमार्फत कामबंद आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. निवेदनावर संघटनेचे एस. ए. माचन्ना, पी. एम. पवार, आर. एम. माने, टी. एम. आयळे, एस. एम. खरात, पी. एम. कांबळे, पी. ए. बनसोडे, एस. एस. गिरी, व्ही. बी. मुसांडे, के. के. पोपळगर, एस. व्ही. पंढरगेरी, एस. एम. काझी यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...