आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिजाऊ चौक, निरज गॅस एजन्सी ते पुजारी हाॅटेल, ज्ञानेश्वर मंदिर परिसरात सकाळी व सायंकाळी भाजीपाल्याच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, व्यापारी रस्त्याच्या साईडपट्ट्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करतात. यामुळे नागरिक रस्त्यावर दुचाकी उभा करून भाजीपाल्याची खरेदी करतात. परिणामी अपुऱ्या रस्त्यामुळे निरज गॅस एजन्सी ते पुजारी हॉटेलदरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून पोलिस प्रशासनाकडून कानाडोळा होत आहे. याचा सामान्यांना त्रास होत आहे.
उस्मानाबाद शहरात रविवारी आठवडी बाजार भरतो. मात्र, अनेक शेतकरी व व्यापारी शहरातील विविध ठिकाणी भाजीपाल्याच्या विक्रीसाठी रस्त्याच्या बाजुला ठेले मांडून बसतात. यामुळे शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला मिळतो. मात्र, व्यापारी रस्त्याच्या कडेला बसण्याऐवजी ऐन रस्त्याच्या साईडपट्टयावरच ठाण मांडून बसतात. यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून रस्त्यावर किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
यामध्ये जिजाऊ चौक परिसर, निरज गॅस एजन्सी ते पुजारी हॉटेल, ज्ञानेश्वर मंदिर परिसर, देशपांडे स्टँड परिसरात रस्त्यावर भाजीविक्री केली जाते. यामध्ये बोटावर मोजण्याएवढे शेतकरी असतात. सर्वाधिक व्यापाऱ्यांनी मोठ मोठे ठेले मांडले असून दिवसभर विक्री करतात. यामुळे सकाळी व सायंकाळी भाजी घेण्यासाठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते.
काही दुचाकी व चारचाकीचालक वेगात आल्याने अपघातही झाले आहेत. यामुळे नेहमीच बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. पालिकेने शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्ता व साईडपट्ट्या सोडून भाजी विक्री करण्याच्या सूचना देण्याची गरज आहे.
शहरात दैनंदिन भाजीविक्रेत्यांसाठी अनेक भागात कठडे बांधून सोय करण्यात येणार आहे. यासाठी पथकाची नेमणूक करून माहिती घेण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर भाजीविक्री करणाऱ्यांना सूचनाही देण्यात येणार आहेत. त्यानंतर रस्त्यावर भाजीविक्री केल्यास दंड आकारू वसूल केला जाणार आहे. -वसुधा फड, मुख्याधिकारी, उस्मानाबाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.