आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटिबद्ध:संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले; महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध

उस्मानाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह आहे, ही वस्तूस्थिती बदलण्यासाठीच आलोय. तुम्हाला महिन्यात बदल दिसेल, असे सांगून संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी स्पष्ट भूमिका उस्मानाबादचे नूतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी (दि.१४) दुपारी नूतन पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांच्याशी वार्तालाप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हेही उपस्थित होते. पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, शहरातील कायदा-सुव्यवस्थेबद्दल मला माहिती मिळाली आहे. संघटित गुन्हेगारांवर कारवाया प्रस्तावित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी भेटून यासंदर्भातील निर्णय घेत आहोत.

महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी शहरात पोलिसांची स्वतंत्र टीम कार्यरत करण्यात येईल. रस्त्यावर वाढदिवस करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करू, चोरी, दरोड्यांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी गस्तीचे नियोजन करू. पत्रकारांनी केलेल्या सूचनांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत पुढील काळात शहरात तसेच जिल्ह्यात चांगले बदल दिसतील, असे सांगितले.

सायबर गुन्हे रोखणे, महिला सुरक्षा जनजागृती यासह ग्राहक तक्रार दिनाचे आयोजन करुन नागरिकांशी संवाद ठेवत कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारांवर कायद्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील. पोलिस व जनता संबंध सुधारण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन महिन्यातील दोन शनिवारी होणार आहे. यात जिल्ह्यातील नागरिकांशी आपण स्वतः पोलिस अधिक्षक या नात्याने किंवा अति.

पोलिस प्रशासनात बदलांची अपेक्षा
गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात पोलिसांचा वचक कमी झाला आहे. काही महिन्यापूर्वी उस्मानाबादकरांना चोरट्यांच्या भीतीमुळे रात्री गस्त घालावी लागली. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतली नाही. लोकप्रतिनिधींनीही पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सामंजस्य नसल्याने खालच्या स्तरावर यंत्रणा गाफिल होती, असेही समजते. मात्र, आता कडक शिस्तीचे पोलिस अधीक्षक मिळाल्याचे सांगितले जात आहे. कुलकर्णी हे २०१५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील असून त्यांचे सर्व शिक्षण बंगळुरू येथे झाले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कुलकर्णी यांनी स्पर्धा परीक्षेतून पोलिस सेवेत प्रवेश केला आहे. त्यांनी मीरा-भाईंदरसह नक्षलग्रस्त भागातही धडाकेबाज काम केले आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जे कठोर निर्णय घ्यावे लागतील ते घेऊ, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...