आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारत जोडो’ला पाठिंबा:काँग्रेसच्या पदयात्रेला उस्मानाबादेत जोरदार प्रतिसाद, फुले उधळून फटाके फोडत स्वागत

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी शहरात शुक्रवारी (दि.) आयोजित करण्यात आलेल्या उस्मानाबाद शहर पदयात्रेत भाजप वगळता अन्य पक्षांनी आपसात मोट बांधली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकापचेही नेते यात्रेत सहभागी झाले होते. आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात एकत्रित निवडणुका लढवण्याचे संकेत दिल्याची चर्चा शहरात आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. आता राज्यातही या यात्रेचे आगमन होत आहे. या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी शहरात उस्मानाबाद शहर पदयात्रा आयोजित करण्यात आली. याची सुरुवात जिजाऊ चौकातून करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे नेते माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे या काँग्रेस नेत्यांसोबत शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पालिकेतील माजी गटनेते सोमनाथ गुरव, शेकापचे एम. डी. देशमुख, धनंजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्याज शेख, वाजिद पठाण आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या नेत्यांसोबत अन्य पक्षांचे नेते अर्धवेळ तर काही पूर्णवेळ पदयात्रेत सहभागी झाले. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी आपला एकसंघपणा दाखवल्याची शहरात चर्चा आहे. भाजपच्या विरोधात यापुढील निवडणुकांमध्ये एकत्रित लढा देण्याचे संकेत या सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्याचे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. दरम्यान, यात्रेचा समारोप शहरातील मदिना चौकात करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले तर काँग्रेसचे खलिल सय्यद यांनी आभार मानले.

देशाला एकात्मता, अखंडता जोपासण्याची गरज समारोपाच्या सभेत माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील म्हणाले की, देशाला आता एकात्मतेची गरज आहे. सध्या देशातील वातावरण कलुषित झाले आहे. बिघडलेले वातावरण व्यवस्थित करण्यासाठी राहुल गांधी यांनी यात्रा काढली आहे. याला सर्व देशवाशियांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उस्मानाबाद शहरातील नागरिकांनीही एकात्मता व अखंडता जोपासण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

शहरात काँग्रेसला चांगले वातावरण यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे म्हणाले की, देशात, राज्यात तसेच शहरातही काँग्रेसला चांगले वातावरण आहे. उस्मानाबादकरांनाही शांतता हवी आहे, यामुळेच काँग्रेसला चांगला पाठींबा मिळत आहे. काँग्रेस पक्षाने शहरवाशीयांची आतापर्यंत सेवा केली आहे. तसेच नागरिकांनीही काँग्रेसला साथ दिली आहे. यापुढेही असेच वातावरण ठेवून शहराला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पक्ष कटीबद्ध आहे.

फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी यात्रेला उस्मानाबादेत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आर्य समाज, अंबाला हॉटेल, जिल्हा रुग्णालय, मारवाडी गल्ली, काळा मारुती चौक आदी ठिकाणांहून शम्स चौकातून मदिना चौकात जाऊन यात्रेचा समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत फटाके फोडून व फुले उधळून करण्यात आले. अंबाला हॉटेल जवळ किशोर राऊत, शम्स चौकात बिलाल कुरेश व मुहिद शेख मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...